भाजपचे मंत्री जयकुमार रावल हे भूमाफिया:-नवाब मलिक यांचा आरोप ; रावल यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करुन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा…
मुंबई : पर्यटनमंत्री मंत्री जयकुमार रावल हे भूमाफिया असून, ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोलाने खरेदी करत आहेतच शिवाय त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचीही जमीन बळकावली आहे. रावल यांना धर्मा पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत धरुन त्यांच्यावर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा आणि त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी त्याचबरोबर त्यांना मदत करणारे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
धुळे जिल्हयातील विखरण देवाचे येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी रात्री निधन झाले. त्यांना शिंदखेडा औष्णिक प्रकल्पात गेलेल्या त्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला मिळाला नाही. म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.यूपीए काळामध्ये ग्रामीण भागात चौपट मोबदला आणि शहरी भागात दुप्पट मोबदला देण्याचा कायदा झाला होता परंतु २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने हा कायदा बदलण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर हा कायदा मोदी सरकारला बदलता आला नाही.
शिंदखेडामधील औष्णिक प्रकल्पाचे भूसंपादन हे २००९ मध्ये करण्यात आले त्यावेळी काही शेतकऱ्यांनी विरोध केला तर काहींनी पाठिंबा दिला. त्यामध्ये धर्मा पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचा विरोध होता. आणि योग्य मोबदला मिळाला नसल्यानेच धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली मात्र ही आत्महत्या नसून ती हत्या आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला.१९७६ मध्ये भूसंपादन कायदा आल्यानंतर एखादयाकडे ५० ते ५२ एकरच्यावर जमीन ठेवता येत नसताना रावल यांच्याकडे दोंडाई येथे वेगवेगळी कुटुंब दाखवत ८०० एकर जमीन उपलब्ध आहे. इतका मोठा भूसाठा कसा. यांची जमीनीची भूक संपत नाही हे यावरुन दिसत आहे.जयकुमार रावल यांचे दोन जिल्हयामध्ये भूमाफियासारखे काम सुरु आहे.
शेतकऱ्यांची जमीन कवडीमोलाने खरेदी करायची आणि करोडो रुपयांनी विकायची असा धंदा रावल आणि कंपनीचा सुरु असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.२००६ साली ४ हेक्टर जमीन बहाणे नावाचा गाव आहे तिथे पंचरत्ना रावल या नावाने संपादीत जमीन घेतली. आणि त्या जमीनीवर १ कोटी रुपयांचा मोबदला घेतला याचे पुरावे आमच्याकडे आहेत. याबाबतची तक्रार मुख्यमंत्री, जिल्हयाचे पोलिस अधिक्षक आणि एसीबीकडे करण्यात आल्यावर कारवाईला सुरुवात झाली मात्र मुख्यमंत्र्यांनी दबाव आणत ही कारवाई थांबवली असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
शिंदखेडा आणि परिसरातील जमीन ही २००९ मध्ये भूसंपादीत झाली. कायदयाने नोटीफिकेशन निघाल्यानंतर जमीन खरेदी करता येत नाही. तरीही रावल यांनी १.७६ हेक्टर जमीन २० एप्रिल २०१२ ला २ लाख ८३ हजार रुपयांना खरेदी केली. कायदयाने नोटीफिकेशन झाले असताना रजिस्टारने दस्ताऐवज तयार केला कसा. जमीनीचा फेरफार कसा करण्यात आला. याचा अर्थ जमीन खरेदी झाली म्हणजे तो बेकायदेशीरपणे जमीन व्यवहार झाला असा आमचा आरोप आहे.धर्मा पाटील यांच्या जमीन मोबदल्यासंदर्भात २२ जानेवारीला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनामध्ये बैठक ठेवण्यात आली होती परंतु ती बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळेच धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. ती आत्महत्या नाही तर ती हत्या आहे.
Add new comment