लाइव न्यूज़
मंत्रालयात विष प्राशन केलेल्या धर्मा पाटील यांचे अखेर निधन
Beed Citizen | Updated: January 29, 2018 - 3:17pm
मुंबई (वृत्तसेवा) भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या प्रश्नावरून आठवड्याभरापूर्वी मंत्रालय परिसरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे ८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचे अखेर रविवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत वडिलांचे पार्थिव ताब्यात घेणार नसल्याचे पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील पाटील यांची पाच एकर जमीन औष्णिक वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. सुपिक जमीन असतानाही केवळ चार लाख रूपये मोबदला दिल्याने ते नाराज होते. मोबदला वाढवून मिळावा यासाठी त्यांनी अनेक मंत्री, अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. गत सोमवारी (दि.२२) त्यांनी मंत्रालयात गेले होते. तिथेही त्यांना निराशा आल्याने त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. पोलिसांनी त्यांना सेंट जॉर्ज रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जे. जे. रूग्णालयात हलवण्यात आले होते. धर्मा पाटलांच्या मुलाने अवयवदानाचा अर्ज भरला होता. त्यानुसार निकामी न झालेले अवयव दान करण्यात येतील.
जमिनीचा योग्य मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतकरीचा दर्जा देण्याचे आश्वासन सरकार लेखी स्वरुपात देणार नाही, तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका नरेंद्र पाटील यांनी घेतल्याचे ‘एबीपी माझा’ने म्हटले आहे. धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची ६०० झाडे होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या पाटील यांना केवळ चार लाखांचा मोबदला देण्यात आला होता. इतर शेतकर्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरे मिळत नसल्याने कंटाळून त्यांनी विषप्राशन केले होते. पाटील यांच्या विषप्राशनानंतर खडबडून जागे होत सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाखाचे सामुग्रह अनुदान देऊ केले. मात्र अनुदान नको, आम्हाला मोबदला द्या, अशी मागणी पाटील कुटुंबाने केली आहे.
--------
Add new comment