बीडमधील महा मूक मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

बीडमधील महा मूक मोर्चा आता
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
बीड ( प्रतिनिधी) बीड येथे शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय महा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सुरुवातीला हा मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयावर काढण्यात येणार होता. मात्र या प्रकरणातील सर्वच गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे मोर्चा नेमका पोलीस अधीक्षक कार्यालयावर काढण्यात येणार आहे की जिल्हाधिकारी कार्यालयावर असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र आता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या महा मूक मोर्चामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार , आमदार जितेंद्र आव्हाड व इतर लोकप्रतिनिधी, नेते सहभागी होणार आहेत. त्या अनुषंगाने या मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. मोर्चाचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होणारा हा मोर्चा माळीवेस-सुभाष रोड-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक- बस स्टँड - छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थ) , मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करा, खंडणीतील आरोपींवर स्व.संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा कायदेशीर गुन्हा दाखल करावा, मस्साजोग ( ता. केज ) येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी मंजूर करावी या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. दरम्यान मोर्चाचे पोस्टर आणि मोर्चा मार्ग विषयी माहिती दर्शवणारे फलक सोशल मीडियातून व्हायरल झाले आहेत.
Add new comment