गेवराई बायपासवर वाहनधारकांना लुटीचे प्रकार वाढले; मध्यरात्री दोघांना लुटले, पोलिसांचे दुर्लक्ष
बीड, (प्रतिनिधी):- गेवराई शहराबाहेरून जाणार्या बायपास रोडवर वाहन धारकांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. काल मध्यरात्री काही वाहनधारकांना मारहाण करून लुटल्याची घटना घडली. त्यापैकी दोन वाहनधारक गेवराई पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याचे सुत्रांनी सांगितले. यापुर्वीही बायपास रोडवर अनेकदा असे प्रकार घडले आहेत. मात्र स्थानिक पोलिस त्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी याप्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी होवू लागली आहे.
बीड येथील काही जण वाहनाने गेवराई बायपास मार्गे औरंगाबाद, जालन्याकडे जात असतांना मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास 15 ते 20 जणांच्या टोळीने त्यांचे वाहन अडवून लुट केली. बीडच्याच नव्हे तर औरंगाबाद,उस्मानाबाद येथून येणार्या वाहनांनाही चोरट्यांच्या लुटीचा त्रास सहन करावा लागला. त्यापैकीच शेख बिलाल शेख मंजुर या वाहनधारकाजवळील मोबाईल आणि रोकड त्याचबरोबर उमरगा येथील गणेश गायकवाड नावाच्या वाहनधारकाकडूनही मोबाईल आणि रक्कम लुटल्याची घटना घडली. याशिवाय इतरही वाहने अडवून त्यांची लुट झाल्याचा प्रकार घडला. मात्र त्यातील अनेकजण परजिल्ह्यातील आणि लाईनवरील गाड्या असल्याने त्यांनी तक्रार देणे टाळले. मात्र हे दोघेजण तक्रार देण्यासाठी सकाळपासून गेवराई पोलिस ठाण्यात बसून होते. दुपारी उशिरा पोलिस पंचनाम्यासाठी रवाना झाले होते. दरम्यान गेवराई बायपासवर यापुर्वी अनेकदा वाहन लुटीचे प्रकार घडलेले आहेत. पोलिसांनी याकडे वेळीच लक्ष घालावे. बायपास रोडवर पेट्रोलिंग वाढवावी अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Add new comment