डॉ. जोगदंडला वाचविण्याच्या प्रयत्नात कार्यकारी अभियंताच गोत्यात
कार्यकारी अभियंता बेद्रे यांना जिल्हाधिकार्यांनी पाठवली कारणे दाखवा नोटीस
बीड, (प्रतिनिधी):- वादग्रस्त गुत्तेदार डॉ. जोगदंडच्या डी बी कन्स्ट्रक्शनला वाचविण्याच्या नादात आता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंताच गोत्यात आले आहेत. कार्यकारी अभियंता ए .एम बेद्रे यांनी डी बी कन्स्ट्रक्शन ची बिले देताना निष्काळजीपणा दाखविल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे सांगत बीडच्या जिल्हाधिकार्यांनी कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणात 7 दिवसात खुलासा न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
डॉ. जोगदंडच्या डी बी कन्स्ट्रक्शन ने केलेल्या बोगस कामाची चौकशी करण्याची तक्रार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे यांनी केली होती. या प्रकरणात जिल्हाधिकार्यांनी रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता ए. एम . बेद्रे यांचा अहवाल मागितला होता. मात्र बेद्रे यांनी प्रशासनाला गोलगोल अहवाल दिला होता. यावर पुन्हा घुमरे यांनी जिल्हाहंडीकर्यांकडे तक्रार केली होती तसेच प्रत्यक्ष सुनावणीत या अहवालावर आक्षेप घेतले होते.
या पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आता कार्यकारी अभियंता बेद्रे यांना नोटीस बजावली आहे. सदरील गुत्तेदाराने गौणखनिज कोठून आणले याची खातरजमा केली नाही , त्याची रॉयल्टी भरल्याच्या पावत्या पहिल्या नाहीत तसेच याची खात्री न करता कंत्राटदाराला देयके अदा केल्याचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणात प्रचंड निष्काळजीपणा दाखविल्याचे सांगत जिल्हाधिकार्यांनी कार्यकारी अभियंता बेद्रे यांना नोटीस बजावली असून 7 दिवसात खुलासा सादर करायला सांगितले आहे. अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता डॉ. जोगदंडच्या डी बी कन्स्ट्रक्शनला पाठीशी घालण्याचा प्रयत्न कार्यकारी अभियंत्याच्याच अंगलट आला आहे.
Add new comment