अंबाजोगाई रुग्णालयाचा गलथान कारभार ; मृतदेहाची अदलाबदल
अंबाजोगाई रुग्णालयाचा गलथान कारभार ; मृतदेहाची अदलाबदल
बीड ( प्रतिनिधी ) अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयाचा गलथान कारभार आणि बेजबाबदारपणा समोर आला आहे. बीड येथील एका तरुणाचा निमोनियामुळे मृत्यू झाल्यानंतर कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह आलेली असतांना रुग्णालय प्रशासनाने किटमध्ये गुंडाळून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. बीडला गेल्यानंतर किट काढा आणि अंत्यविधी करा असे त्यांना सांगण्यात आले होते. रुग्णवाहिकेतुन मृतदेह बीडमध्ये आणल्यानंतर कुटुंबियांनी पाहिला असता तो मृतदेह आपल्या नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. मृतदेहाची अदलाबदल झाल्याने तो मृतदेह तसाच रुग्णवाहिकेतून शनिवारी रात्री उशिरा अंबाजोगाईला नेण्यात आला.
बीड शहरातील मोमीनपुरा भागातील 32 वर्षीय तरुणाला निमोनिया झाल्याने अंबाजोगाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला अँटिजेन टेस्टमध्ये ते निगेटिव्ह आले. त्यांनतर त्यांचा स्वॅब घेण्यात आला, तो अहवालही कोरोना निगेटिव्ह आला. मात्र निमोनियामुळे शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. रात्री 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास रुग्णालय प्रशासनाने किटमध्ये गुंडाळून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला व बीडला गेल्यानंतर किट काढून अंत्यविधी करा असे कुटुंबियांना सांगण्यात आले. मात्र येथे आल्यानंतर मृतदेह आपला नसल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यामुळे सदरील मृतदेह पुन्हा रुग्णवाहिकेतून अंबाजोगाईला पाठवण्यात आला. याबाबतची माहिती कळविल्यानंतर तरुणाचा मृतदेह अंबाजोगाई रुग्णालयात असल्याचे प्रशासनाने सांगितल्याने रात्री उशिरा कुटुंबिय मृतदेह आणण्यासाठी अंबाजोगाईला गेले. दरम्यान या प्रकारामुळे कुटुंब, नातेवाईक आणि नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. अंबाजोगाई रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे मृतदेहाची अदलाबदल झाली. या प्रकारामुळे बेजबाबदारपणा समोर आला असून रुग्णालयाच्या चुकीमुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागला.
Add new comment