अवघ्या चार दिवसांतच ‘तो’ झाला करोनामुक्त

उस्मानाबाद दि.24 ( प्रतिनिधी ) कोरोनाची खूप भीती वाटतेय ना. नाव काढलं तरी आपण घाबरून जातोत. मात्र खरंच घाबरू नका, काळजी घ्या. कोरोनावर खबरदारी हाच मोठा उपचार आहे. हाच संदेश उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनामुक्त तरुणाने दिला आहे. वाचा तो काय म्हणतोय . 

ताप अन अंगदुखीचा त्रास वाढला म्हणून परंडा येथील सरकारी दवाखान्यात दाखल झालो. तपासणीनंतर कळलं की आपल्याला करोना झालाय. ऐकूनच खूप घाबरून गेलो. पण डॉक्टर आणि सिस्टरनी खूप काळजी घेतली. वेळेवर गोळ्या दिल्या, आपुलकीने उपचार केले. अवघ्या चार दिवसांतच ठणठणीत बरा झालो. आवश्यक ती खबरदारी घेतल्यास करोना आपलं काहीच वाकडं करू शकत नाही. हे शब्द आहेत करोनामुक्त झालेल्या सरणवाडीच्या तरुणाचे. वेळीच निदान झाल्यानंतर योग्य उपचार घेऊन तो आठवडाभरापूर्वीच घरी परतलेला आहे.

परंडा तालुक्यातल्या सरणवाडीत राहणारा तीस वर्षाचा एक तरुण जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण घेतलेले. स्वतःचा मालवाहतूक टेम्पो घेवून पुणे, मुंबई भागात दररोज शेतीमालाची वाहतूक करायचा. देशात, राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला तरी त्याचे हे नित्याचे काम सुरूच होते. त्यातच अचानक ताप आणि अंगदुखी जाणवू लागली, तोंडाची चवही गेली, भूकही लागेना, आहार कमी झाल्याने प्रचंड थकवा आला. 10 मे रोजी परंडा येथील उपजिल्हा रुग्णालय गाठले. पुणे-मुंबई प्रवासात आपल्याला करोनाची लागण तर झाली नसावी? हा संशय मनात होताच. या कालावधीत सार्वजनिक स्वच्छतागृह किंवा टोलनाक्यावर पण थांबलो होतो. कदाचित तिथेच संसर्गाची बाधा झाली असावी. डॉक्टरांनी तपासणीसाठी घश्यातील स्वब घेतले; दुसर्‍या दिवशी दुपारी तीन वाजता करोना झाल्याचा रिपोर्ट आला आणि पुरता हादरलो, पण हिंमत हरलो नाही. सुरुवातीला ताप अन् अंगदुखीमुळे अशक्तपणा जाणवत होता. दोन दिवस सलाईन दिले. सलग चार दिवस सकाळी चार आणि रात्री चार गोळ्या सिस्टर न विसरता आणून देत. समोर थांबून खायला सांगत. डॉक्टर आणि दवाखान्यातील सर्वच कर्मचार्‍यांनी आपली मन लावून काळजी घेतली. त्यामुळेच आपल्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची भावना आणि समाधान तो आत्मीयतेने व्यक्त करतो. उपचार सुरू झाल्यानंतर दोनच दिवसात आपल्याला बरे वाटू लागले. ताप आणि अंगदुखी कमी झाली. थकवाही दूर झाला. तोंडाला चव जाणवू लागली. उपचार सुरूच होते पोटभरून जेवण सुरू झाले. अनेकांनी फळे दिली होती. अवघ्या चारच दिवसात पूर्वीसारखे बरे वाटू लागले. ज्या रोगाचे नाव ऐकून मनात धडकी भरत होती तोच रोग चार दिवसात आपण पिटाळून लावला यावर विश्वासच बसत नव्हता. पुन्हा एकदा तपासणीसाठी लातूरला नमुने पाठविले. दवाखान्यात दाखल झाल्यापासून पाचव्या दिवशी तर घरी जाण्यासाठी आपण तयार होऊन बसलो होतो मात्र, अहवाल अद्याप आला नव्हता.

चार दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर करोनासारख्या आजारातून आपण सहज मुक्त होऊ शकतो. तंदुरुस्त झालो तरी डॉक्टरांनी आणखी तीन दिवस निगराणीखाली ठेवले. त्यांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टी तंतोतंत पाळल्या. या कालावधीत थंड पाणी किंवा अन्य कोणतेही थंड पदार्थ जेवणात घेतले नाही. अखेर 18 मे रोजी आपण कोरोनातून पूर्णतः बरे झालो असल्याचा अहवाल आला. जिल्ह्याच्या दवाखान्यात न जाता, कोणत्याही मोठ्या डॉक्टरला न दाखवता आणि पैसे अजिबात न खर्च करता करोनातून आपण बरे झालो यावर विश्वासच बसत नव्हता. 19 मे रोजी दवाखान्यातून घरी परतलो. आई-वडील आणि पत्नीसोबत शेतात वस्तीवर मुक्कामी आहे. आज सहा दिवस झाले आणखी आठ दिवस घरीच थांबावे लागणार आहे. त्यानंतर माझ्या दैनंदिन कामासाठी मी सज्ज असेन असा विश्वासही त्या बहाद्दर तरुणाने व्यक्त केला. गावातल्या दवाखान्यातही उपचार घेतल्यावर करोना सहज बरा होतो यावर आपला ठाम विश्वास असल्याचे मत करोनामुक्त झालेल्या तरुणाने व्यक्त केले. 

खरंच या कोरोना मुक्त झालेल्या तरुणाचा संदेश सर्वांनाच एक ऊर्जा देणारा आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.