अखेर सीएस डॉ.थोरात यांनी कोरोना वार्डाची पाहणी करून सुविधांचा आढावा घेतला
बीड दि. 20 ( सिटीझन ) जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डात शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी बुधवारी रात्री उशिरा भेट देवून तेथील सुविधांचा आढावा घेतला. डॉ.थोरात स्वतः पीपीई किट घालून आत गेले आणि तेथील कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. दरम्यान यासंदर्भात सायं दै. सिटीझन ने दि.19 मे रोजीचा अंकात वृत्त प्रकाशित करून तेथील सुविधांविषयीचा खरा प्रकार वाचकांसमोर आणला. एका कोरोना बाधित महिलेने सिटीझनशी साधलेला संवाद आणि त्या संवादातून जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची झालेली पोलखोल चर्चेचा विषय ठरली. त्या बाधित रुग्णाची आपबीती वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले असावे. बीडमध्ये कोरोना बाधित रुग्णासोबत असाही प्रकार होतो हे वाचून अनेक जण थक्क झाले होते. तेथील गैरसोयीविषयी त्या बाधित रुग्णाने केलेले कथन डोक्यात झनझणीत मुंग्या आणणारे होते, त्यामुळेच सिटीझनने ही वस्तुस्थिती समोर मांडली होती. गेल्या दोन महिन्यांत सीएस आणि आरएमओ यांनी एकदाही कोरोना वार्डाचा राउंड घेतला नव्हता हे देखील वाचकांसमोर आणलं होतं. अखेर उशिरा का होईना सीएस साहेबांनी आज कोरोना वार्डात जावून सुविधांची पाहणी केली. त्याठिकाणी असलेल्या रुग्णांचे हाल होऊ नयेत. त्यांना आवश्यक त्या सुविधा नियमानुसार मिळायला हव्यात हीच यामागची भूमिका होती.
Add new comment