बीडचे ' मोदी ' राज्यभर चर्चेत ! निवडणूक विधान परिषदेची मात्र बोलबाला बीडचा
निवडणूक विधान परिषदेची
मात्र बोलबाला बीडचा
बीड दि.10 ( सिटीझन ) विधान परिषदेच्या 9 जागांसाठी दि. 21 मे रोजी निवडणूक होत आहे. काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केल्याने राजकीय गोटात तर्कवितर्क लावले जात आहेत. निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्नात असलेल्या सर्वांनाच मोठा धक्का बसला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. आता विधान परिषदेच्या 9 जागा बिनविरोध होणार की त्यासाठी निवडणूक होणार ? हे राजकीय घडामोडींवर अवलंबून असले तरी सध्या राज्यभर चर्चा आहे ती बीडच्या मोदींचीच !
बीड जिल्ह्यातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. राजकारण, समाजकारण, सहकार आणि शिक्षण क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या मोदींची चर्चा राज्याच्या राजधानीत होऊ लागली आहे. काँग्रेसने जाहीर केलेले दुसरे उमेदवार पापा मोदी कोण आहेत ? राजकिय पार्श्वभूमी काय ? याची चर्चा राज्याच्या राजधानी पुरतीच मर्यादित राहिली नाही तर राज्याचे राजकारण ढवळून काढू लागली आहे. काँग्रेसने सुरुवातीला जालन्याचे राजेश राठोड यांना उमेदवारी जाहीर केल्याचे पत्र आले. त्यावरून काँग्रेस केवळ एकच जागा लढवणार असे वाटत असतानाच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी दुसरा उमेदवार म्हणून राजकिशोर मोदींचे नाव जाहीर केले आणि तेथूनच बीडचे ' मोदी ' राज्यभर चर्चेत आले. सर्वसामान्य आणि एकनिष्ठ असलेल्या मोदींना या उमेदवारीच्या माध्यमातून न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. पापा मोदी आपल्या समाजकारणाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असतात मात्र एका दिवसात ते राज्यभर प्रकाशझोतात आले. काँग्रेसने दुसरा उमेदवार म्हणून मोदींचे नाव जाहीर केल्यानंतर महाआघाडीतील रुसवे-फुगवे देखील समोर आले आहेत. नऊ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीमध्ये नेमके काय होणार ? निवडणूक होणार की सर्व 9 जागा बिनविरोध होणार ? हे राजकिय समीकरणावर अवलंबून असते तरी सध्या मात्र बीडचे ' मोदी ' राज्यभर चर्चेत आले आहेत. निवडणूक राज्याच्या विधान परिषदेची असली तरी बोलबाला मात्र बीडचाच सुरू आहे हे मात्र नक्की.
Add new comment