महिला कला महाविद्यालयातील गृहविज्ञान विभागातून कोविड-19 साठी कापडी मास्कची मदत जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द
बीड (प्रतिनिधी)ः- सध्या जगभर कोरोना विषाणुचा संसर्ग आणि प्रसार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आपल्या देशशत आणि महाराष्ट्रातही याचा संसर्ग वाढत आहे. यामुळे प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या करीता सध्या कापडी मास्क वापरणे आवश्यक आहे. मास्क वापरल्यामुळे आपले स्वत:चे आरोग्य आणि संसर्गापासून बचाव होतो. एकमेकांपासून विशिष्ट सामाजिक अंतर आपण पाळत आहोत. परंतु खोकला, शिंक येणे हे नैसर्गिक आहे तसेच सद्य परिस्थितीत पोलिस, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार हे आपले कार्य दैनंदिन करुन सेवा देत आहेत. करीता हे ओळखून आपणही या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीचा एक हात द्यावा या उद्देशाने येथील महिला कला महाविद्यालय, बीड प्रचार्य डॉ. सविता शेटे यांच्या मार्गदर्शनातून कापडी मास्क बनविणे हा उपक्रम गृहविज्ञान विभागाद्वारा घेण्यात आला.
कापडी मास्क तयार करणे ही सद्याची गरज आहे. यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थीनींना मास्क तयार करण्या संबंधीचे प्रशिक्षण देऊन एक हजार मास्क तयार करण्यात आले. यामध्ये प्रौढांसाठी 900 आणि बालकांसाठी 100 मास्क तयार करण्यात आले. या मास्क तयार करण्यामध्ये विद्यार्थीनी आणि गृह विज्ञान विभागाच्या डॉ. वर्षा कुलकर्णी, डॉ. संध्या आयस्कर यांनीही सहभाग नोंदविला.
शासनाच्या सुचनेप्रमाणे कोरोनाला रोखण्यासाठी जनतेने पाळावयाचे अनेक नियम सांगितलेले आहेत. या जागतिक समस्येला सामोरे जातांना महाविदद्यालयाचाही काही सकारात्मक सहभाग असणे आवश्यक आहे आणि ते आमचेही कर्तव्य आहे. या भूमिकेतून सदरील मास्क स्थितीत आवश्यक सेवेत आसणारे स्थानिक प्रशासनातील पोलिस, आरोग्य, स्वच्छता आणि इतर विभागातील कर्मचारी/कोरोना योध्यांकरीता तयार करण्यात आले आहेत.
सदरील तयार केलेले मास्क बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सविता शेटे, गृह विज्ञान विभागाच्या डॉ. वर्षा कुलकर्णी, डॉ. संध्या आयस्कर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
Add new comment