शेतकऱ्यांना मोफत खत ,बियाणे द्या- आ.नमिताताईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अंबाजोगाई दि.23 ( सिटीझन ) लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र व नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. अगोदरच विविध कारणाने संकटात सापडलेला शेतकरी हातघाईला आला आहे. त्यांचे अर्थचक्र पूर्णत: कोलमडल्याने शासनाने शेतकऱ्यांना मोफत खत व बियानेचा पुरवठा खरीप हंगामासाठी करावा अशी मागणी भाजपच्या आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

                  गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ, गारपीट, वादळी वारे व आता कोरोनाचा फटका यामुळे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे. गेल्यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप हंगाम झाला नाही. परतीचा पाऊस चांगला झाल्याने रब्बी हंगाम झाला. मात्र, गेल्या महिनाभरात सतत होणाऱ्या गारपीट व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या  गहू, हरभरा, ज्वारी, कापूस, टरबूज, आंबे व फळभाज्या व पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी शासनाच्या वतीने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगामाचा पीकविमाही भरून घेण्यात आला नाही. त्यामुळे झालेल्या नुकसानीची दाद प्रशासनाकडे मागायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात गारपीट व वादळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामेही झाले. तरीही शेतकऱ्याना नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही मंजूर झाली नाही. केज विधानसभा मतदार संघात वर्षभरापासून अनेक गावातील पीकविम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्याना प्राप्त झाली नाही. पीक उत्पादन झाले ते बाजारात आणता येईना. भाजीपाल्याला भाव राहिला नाही. वाहतुकीचा खर्चही निघणे दुरापास्त झाले आहे. खवा उद्योग संकटात सापडला आहे. वाहतूक बंद झाल्याने शेतकऱ्याच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध राहिली नाही. अशा भीषण स्थितीत कोरोनाचा शिरकाव शेतकऱ्यासाठी हानीकारक ठरू लागला आहे. अशा स्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी खरीप हंगामासाठी खते व बियाणे शासनाने मोफत उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.