बीड जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश काढले , संचारबंदी कायम मात्र काहीशी सूट
बीड दि.21 ( सिटीझन ) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी मध्यरात्री 1.15 मिनिटांनी म्हणजे आज मंगळवारी पहाटे नवीन उपाययोजना आदेश जाहीर केले आहेत. 30 एप्रिल पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी आणि जमावबंदी आदेश कायम ठेवत काही प्रमाणात सूट दिली आहे. कृषि, मालवाहतूक , आरोग्य सेवा , जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणारे प्रकल्प ( दररोज पूर्ण दिवस ) त्यावर चालणारे घाऊक तसेच किरकोळ दुकानाला परवानगी दिली आहे. मात्र *यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे जी कामे ज्यावेळेत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबींच्या वेळेत कोणताही बदल या आदेशात खास तरतूद केलेली असल्याखेरीज करण्यात येवू नये* असेही रेखावार यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
बीड जिल्हाधिकारी रेखावार यांनी आदेशात म्हटले आहे की, सार्वजनिक वाहतूकीकरिता होणारी बस वाहतूक बंद राहील. रिक्षा बंद राहील.चित्रपट गृहे, मॉल्स, खरेदी संकुले, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार, सभागृहे, बंद राहतील.अंत्यसंस्काराच्या बाबतीत 20 पेक्षा जास्त लोकांच्या जमावास परवानगी नसेल. सर्व प्रकारची आरोग्य सेवा 24 तास सुरू राहील. कृषि आणि कृषीविषयक सर्व कामासाठी दिवसभर परवानगी असेल.बँकांच्या शाखा लाभ धारकांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नियमितपणे चालू राहतील, एटीएम सहकारी संस्था सुरू राहतील. सर्व शैक्षणिक संस्था आणि प्रशिक्षण संस्था बंद राहतील.पेट्रोल,डिझेल पंप, घरगुती गॅस, तेल कंपन्या सुरू राहतील. टपाल सेवा, पोस्ट ऑफिस सुरू राहतील. टँकरने पाणीपुरवठा सुरु राहील.सर्व प्रकारच्या वस्तूंच्या मालवाहतूकीलाही परवानगी देण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्राहक सेवा केंद्र चालू ठेवता येतील. कुरियर सेवा सुरू राहील. फरसाण, मिठाई दुकाने सुरु राहतील. किराणा दुकान, रेशन दुकान, फळे, भाजीपाला, डेअरी , दूध केंद्रे, पोल्ट्री, मांस ,मच्छी दुकाने, वैरण ,चारा यासाठीच्या दुकानांसाठी परवानगी देण्यात आली आहे. सर्व ट्रक व मालवाहतूक करणारी वाहने ज्यामध्ये दोन वाहक व एक मदतनीस असेल यांना परवानगी देण्यात आली आहे. परिणामी जिल्ह्याला आरोग्य, कृषी, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, बँकींग सेवा, ऑनलाईन शिक्षण, मनरेगा कामे, मालवाहतूक, बांधकाम क्षेत्र, उद्योग तसेच खाजगी आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिले आहेत.
ग्रामपंचायत स्तरावरील शासनमान्य ग्राहकसेवा, कुरियर सेवा, शीतगृह, गोदामसेवा, लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या पर्यटकांसाठी तसेच वैधकीय आणि आपत्कालीन कर्मचारी यांच्यासाठी हॉटेल, निवासस्थाने, लॉजही सुरु राहतील. मिठाई दुकाने, विद्युत वितरण निर्मितीसाठी ट्रान्सफॉर्मर उपकरणे दुरुस्ती दुकानेही सुरू राहणार आहेत.
रेल्वे, बस वाहतूक बंद राहील. जिल्ह्यांतर्गत व राज्यांतर्गत हालचाली बंद राहतील. टॅक्सी, ऑटोरिक्षा, सायकल रिक्षा, सर्व चित्रपटगृह, मॉल्स, क्रीडा संकुले, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार, सभागृह बंद राहतील.
सर्वधर्मीय पार्थना स्थळे बंदच !
प्रार्थनास्थळे बंदच राहणार कौरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बंद करण्यात आलेली धार्मिक स्थळ व प्रार्थना स्थळे नागरिकांकरिता बंद ठेवली जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या कालावधीतही जिल्हातील सर्वच प्रार्थना स्थळांवर धार्मिक एकत्रिकरणाला कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
Add new comment