करोनाच्या चाचणीत महाराष्ट्र देशात अव्वल!
करोनाविरोधातील लढाई शिस्तबद्ध पद्धतीने करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते सर्वच नेते व तज्ज्ञ डॉक्टर्स सांगत आहेत. या लढाईत जास्तीतजास्त चाचण्या होणे गरजेचे असताना बहुतेक राज्यं अजूनही फारशी गंभीर नसल्याचेच दिसून येत आहे. मात्र करोनाची चाचणी करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. १८ एप्रिल पर्यंत महाराष्ट्राने देशात सर्वाधिक ५९,१५७ चाचण्या केल्या आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थानचा क्रमांक असून त्यांनी ४२,७१८ चाचण्या केल्या आहेत तर तिसऱ्या क्रमांकावरील गुजरातने ३०,७३८ चाचण्या केल्या आहेत.
देशातील लॉकडाउनची मुदत ३ मे पर्यंत वाढवताना देशासमोर केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० एप्रिपर्यंत वेगवेगळी राज्यं करोनाच्या लढाईत कसं काम करतात याचा सखोल आढावा घेतला जाईल असे सांगितले होते. पंतप्रधानांच्या भाषणानंतरही देशातील अनेक राज्ये गंभीर नसल्याचे चित्र ‘आयसीएमआर’ च्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. १८ एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत ची आकडेवारी आयसीएमआरने जाहीर केली आहे. मागील चार आठवड्यात देशातील कोणत्या राज्यांनी किती चाचण्या केल्या हे यात नमूद केले आहे. महाराष्ट्राने सर्वाधिक चाचण्या केल्यामुळे देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही जास्त दिसत आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये २६,९२० चाचण्या करण्यात आल्या तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत फक्त २०,१४९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
Add new comment