शाखा अभियंता दंडे यांच्याकडील बीड नगरपरिषदेचा अतिरिक्त कारभार काढला - अमर नाईकवाडे
बीड प्रतिनिधी-
नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, जिल्हा पालिका प्रशासन अधिकारी मिलिंद सावंत व सार्वजनिक बांधकाम उपविभाग सोनपेठचे शाखा अभियंता दंडे यांनी संगनमत करून भ्रष्टाचार करण्यासाठी दंडे यांना बीड नगर परिषदेचा उपअभियंता म्हणून अतिरिक्त कार्यभार द्यावा असे विनंती पत्र माननीय मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबाद यांना दिले होते. दंडे यांच्या नियुक्ती करिता देण्यात आलेले पत्र हे खोटे असून तात्काळ दंडे यांच्याकडे दिलेला बीड नगरपरिषदेचा अतिरिक्त कार्यभार काढून टाकावा व नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, मिलिंद सावंत व सतीश दंडे यांचेवर शासनाची, पालिकेची व बीड शहरातील नागरिकांची घोर फसवणूक केल्यामुळे 420, 409 प्रमाने गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी मा.जिल्हाधिकारी मा.पोलीस अधीक्षक व मा.विभागीय आयुक्त यांना दिलेला होता.
पोलीस अधीक्षक कार्यालयाने अतिरिक्त कार्यभार सोपवण्या संदर्भात बीड नगर परिषदेने दिलेल्या विनंती पत्राच्या अनुषंगाने मुख्य अभियंता औरंगाबाद यांना अभिप्राय सादर करण्याचे सांगता क्षणीच मुख्य अभियंता औरंगाबाद यांनी सतीश दंडे यांना दिलेला बीड नगर परिषदेच्या उपअभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला. सदर प्रकरणी निदर्शनास येणारी गुंतागुंती विचारात घेऊन सतीश दंडे यांच्याकडील बीड नगर परिषदेच्या उपअभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात येत आहे म्हणजे रद्द करण्यात येत आहे असेही शेवटी मुख्य अभियंत्यांनी बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष व कंपनीने भ्रष्टाचार करण्यासाठी आखलेला पूर्वनियोजित कट उधळला गेला आहे. सदरील सतीश दंडे शाखा अभियंता यांनी सह्या केलेले 19 कोटींचे टेंडर काही दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर यांच्या धाकाने रद्द करावे लागले होते. पालिकेत होणार्या भ्रष्टाचाराने कोणती पातळी गाठली आहे हे यानिमित्ताने बीड शहरातील जनतेसमोर आले आहे. त्यामुळे 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानातून बीड शहरातील जनतेने भ्रष्टाचार्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी असेही नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी म्हटले आहे.
शहरातील बहुतांश भागात नागरिकांना चिखलातून ये जा करावी लागत असताना, नगर परिषदेचा निधी रस्ता कामांवर खर्च करण्याचे सोडून नगराध्यक्ष मात्र पालिकेच्या पैशावर ताव मारताना दिसत आहेत. नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, पालिका प्रशासन अधिकारी मिलिंद सावंत व शाखा अभियंता सतीश दंडे यांचेवर जोपर्यंत भ्रष्टाचाराचे व फसवणुकीचे गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असेही शेवटी अमर नाईकवाडे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Add new comment