शिवसेनेशी गद्दारी केलेल्यांनी शिवसैनिकांना निष्ठा शिकवू नये-सचिन मुळूक

बीड (प्रतिनीधी )
: बीड मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार ना.जयदत्त क्षीरसागर यांचा विक्रमी मताधिक्क्याने विजयी होणार आहेत. परंतू, काही शिवसेनेकडून लाभ घेऊन गद्दार झालेले आता शिवसैनिकांना निष्ठा शिकवत आहेत. निवडणुका आल्या की आरोप करण्याचा ठेका काही स्वयंघोषित नेत्यांकडे असतो, अशी टिका शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
पुढे पत्रकात सचिन मुळूक म्हणाले की, बीड मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आता जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेत आल्यापासून नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्यामुळे बीड मतदारसंघावर भगवा फडकणार आहे. अठरापगड जातीधर्माचे लोक त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून त्यांना विविध सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या विजयासाठी शिवसेनेच्या महिला आघाडी, युवासेना सर्व शाखा प्रमुख, पदाधिकारी जीवाचे रान करत आहेत. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांचा विजय निश्चित असून विक्रमी मताधिक्क्याने ते विजयी होणार आहेत. मात्र शिवसेनेकडून आमदार, मंत्री पदे उपभोगून शिवसेनेशी गद्दार केलेली स्वयंघोषित नेते आता शिवसैनिकांना निष्ठा शिकवू लागलेत. निवडणुका आल्या की आरोप करण्याचा ठेकाच काही जणांना मिळतो. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून शिवसैनिक व जनतेने जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा व जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कसल्याही भूलथापांना बळी न पडता त्यांनाच मतदान करावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केले आहे
Add new comment