बाजार समितीच्या भूखंडावर सुरू असलेले बांधकामे शासनाच्या नियमानुसारच - सभापती गौतम उत्तेकर
जामखेड (प्रतिनिधी ) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूखंडावर सुरू असलेले बांधकामे शासनाच्या सर्व परवानग्या घेऊन तसेच शासकीय दराप्रमाणे डिपाॅझिट घेऊन भाडेतत्वावर कराराने दिलेले असून कोणत्याही प्रकारच्या भूखंडाची विक्री झालेली नाही असा सांगत गैरमार्गाने कोणत्याही संघटनेने अथवा अंदोलकाने बाजार समितीत अंदोलन करून बाजार समितीच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा बाजार समितीचे सभापती गौतम उत्तेकर व संचालक मंडळाने बाजार समितीच्या बैठकीत बोलताना दिला आहे.
जामखेडच्या जनावरांच्या बाजारासंबंधी चालू असलेल्या आंदोलनाबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक मंडळाच्या तातडीची मिटिंग रविवारी पार पडली. जनावरांच्या बाजाराबाबत सुरू असलेले आंदोलन हे शेतकरी व्यापारी वर्गास वेठीस धरण्याचा प्रकार आहे असे संचालकांचे म्हणणे आहे.अंदोलनाबाबत आपली भूमिका मांडताना बाजार समितीचे सभापती गौतम उत्तेकर म्हणाले की, बाजार समितीने सदरचे भूखंड वरिष्ठ कार्यालयाच्या रितसर परवानग्या घेऊन शासकीय दराप्रमाणे डिपॉझिट घेऊन भाडेतत्त्वावर कराराने दिलेले असून कोणत्याही प्रकारची विक्री केलेली नाही. सदर भूखंड शेतीपूरक व्यवसाय करण्याकरिता सदर लायसन्स धारक व्यापाऱ्यांना कराराने दिले आहेत.
सदर भूखंड हे बाजार समितीच्या संरक्षण भिंतीलगत व शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजूस असून हे भूखंड गेल्या दोन वर्षांपूर्वी भाडे कराराने दिलेले आहेत. बाजार समितीच्या वतीने जनावरे व शेळी-मेंढी बाजारासाठी नवीन पंधरा एकर जमीनीची खरेदी केली असून त्या ठिकाणी अद्ययावत सुखसुविधा निर्माण केल्याशिवाय सध्याचा जनावरे व शेळ्या-मेंढ्यांचा बाजार नवीन जागेत हलवला जाणार नाही. सध्या भरत असलेल्या ठिकाणी मोकळी भरपूर जागा आहे. त्याठिकाणी मोकळ्या जागेतील बाजार समितीने लावलेली झाडे तोडली जाणार नाहीत. आजपर्यंत संचालक मंडळाने शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून भविष्यातही शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात येतील. बाजार समितीच्या वतीने विनंती करण्यात येते की गैरमार्गाने कोणत्याही संघटनेने अथवा आंदोलनकर्त्यांनी बाजार समितीवर आंदोलन करू नये व बाजार समितीचे तसेच शेतकरी वर्गाचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी व बाजार समितीच्या मालमत्तेची नवीन बांधकामाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
यावेळी झालेल्या बैठकीस बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर उपसभापती सौ शारदा भोरे संचालक सुधीर राळेभात, सुभाष जायभाय, तुषार पवार,महादेव डुचे, मकरंद काशीद, वैशाली पृथ्वीराज वाळुंजकर, बाजीराव भोंडवे, ज्योती त्रिंबक कुमटकर, सागर सदाफुले, करण ढवळे, अरुण महारनवर, काकासाहेब गर्जे, राजेंद्र कोठारी, विनोद नवले, शिलाभाई शेख, सचिव लक्ष्मणराव कांबळे, सहसचिव वाहेदभाई सय्यद सह आदी उपस्थित होते.
Add new comment