एसटी झाली ७१ वर्षांची; एसटी महामंडळाचा १ जून रोजी वर्धापनदिन

  मुंबई: राज्यातील खेड्यापाड्यांतून, गावागावांतून विहार करणारी लालपरी आता ७१ वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापनदिन येत्या शनिवारी १ जून २०१९ रोजी राज्यात सर्व विभागीय आणि जिल्हापातळीवरील एसटीच्या सर्व ५६८  बसस्थानकांवर  साजरा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी म्हणजे एसटीने काळानुसार कात टाकली असून अनेक स्वागतार्ह बदलही केले आहेत. एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहेत, असेही मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. एसटीने लालपरीपासून सुरू केलेला प्रवास हिरकणी, शिवनेरी, शिवशाही ते विठाई असा सुखद टप्प्यावर आणला आहे. एसटीचा हा ७१ वा वर्धापनदिन राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवर उत्साहात साजरा करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यातील नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन आणि सत्कार संबंधित ठिकाणी करण्यात येणार असल्याचेही दिवाकर रावते यांनी सांगितले.

एसटीच्या मुंबईतील प्रमुख कार्यालयातही सोहळा करण्यात येणार असून यानिमित्ताने गोकुळदास तेजपाल सभागृहात एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. परिवहन आणि खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख तसेच एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, एसटीचे महाव्यवस्थापक, सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, संघटनांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी राज्यातील सर्व कर्मचारी आणि एसटी प्रवाशांना ७१ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.