ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी आ.क्षीरसागरांनी घेतली व्यापक बैठक
बीड (प्रतिनिधी )ः- सध्याची भिषण परिस्थिती लक्षात घेता वीज, पाणी, जनावरांचे संगोपन, छावणी चालकांच्या समस्या, अन्न धान्य पुरवठ्याची समस्या जाणून घेण्यासाठी बीड मतदार संघातील ग्रामीण भागातील सर्व सरपंच, उपसरपंच, छावणी चालक, रेशन दुकानदार यांची व्यापक बैठक घेऊन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी समस्या जाणून घेतल्या असून त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
या बैठकीत बोलताना आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, आता निवडणूका संपल्या आहेत 23 मे ला निकाल लागेल, निकाल महायुतीच्या बाजूनेच लागणार असून हे आरशा ईतके स्पष्ट आहे. निवडणूका असतील किंवा नसतील परंतू समस्या मात्र दुष्काळामुळे समोर आल्या आहेत. पाण्याचे मोठे संकट उभे असून जागोजागी पाण्याचे टँकर सुरू झाले आहेत. लोकसंख्या वाढली आहे जुन्या लोकसंख्येनुसार वाटप होणारे टँकर पुरेसे नाही त्यामुळे आपण पाठपुरावा करून आग्रहाची मागणी केल्यामुळे 10 टक्के टँकर वाढवून मिळाले आहेत. योग्य मागणीला मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मकता मिळाली आहे यामुळे मोठा आधार मिळाला आहे. काही ठिकाणी वृक्ष लागवडीच्या नावाखाली स्वःचे संगोपन चालू असून याकडे अधिकार्यांनी तात्काळ लक्ष द्यावे. बुडीत क्षेत्रात विशेष योजनेतून विहीरी घेण्याची मागणी आपण केली आहे. दुष्काळी परिस्थितीत गांभीर्याने प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत. वीजेच्या बाबतीत अनेक ठिकाणी जुन्या तारा बदलणे, डि.पी.बसवणे ही कामे महत्वाची आहेत तसेच अशा परिस्थितीत प्रत्येक नागरीकाला आधार कार्डच्या आधारे धान्य पुरवठा करण्याची सुचना आपण केली आहे. दुष्काळी अनुदान, पिक विमा, बोंडआळी अनुदान हे सर्व पैसे शेतकर्यांच्या खात्यात तातडीने जमा व्हावेत यासाठी आपण जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली असून तांत्रिक अडचणींवर मात करून त्या सोडवण्यासाठी सर्वांनी सतर्क रहावे. रेशन कार्डचे वाटप प्रत्येकाला मिळाले पाहिजे, बीड मतदारसंघात दूध उत्पादक शेतकर्यांची मोठी संख्या आहे पण यांना खूप अडचणी येत आहेत हा व्यवसाय शेतकर्याच्या कुटूंबाला मदत करणारा असून दुधाची अनुदान रक्कम कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे अनुदान 15 जून पर्यंत वाढवून मिळावे अशी मागणी देखील आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. छावणी चालकांच्या देखील खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत अनेक छावणी चालकांची बिले वेळेवर मिळत नाहीत. दुष्काळाच्या निगडीत व तीव्रता लक्षात घेऊन शासन दरबारी आपण सतत संपर्कात आहोत. टँकर वाटपाकडे जाणीवपुर्वक सर्वांनी लक्ष द्यावे सुखात सगळेच बरोबर राहतात पण अडचणीच्या काळात बरोबर राहिल्यास तो स्मरणात राहतो. राजकारण हे मर्यादित असते ते टिकणारे नसते पण माणूसकीचे नाते अनंत काळापर्यंत टिकून राहते असे सांगून त्यांनी ग्रामीण भागातील समस्या जाणून घेतल्या.
बैठकीत प्रास्ताविक प्रा.जगदीश काळे यांनी केले यावेळी विलास बडगे दिनकर कदम, अरूण डाके, दिलीप गोरे, गणपत डोईफोडे, वैजीनाथ तांदळे, दिलीप भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बीड मतदारसंघातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, छावणी चालक, रेशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Add new comment