लाइव न्यूज़
वडवणीत भरदिवसा वीस तोळे सोन्याची लुट सराफा दुकानातील टेबलवर ठेवलेली पिशवी पळवली
Beed Citizen | Updated: July 16, 2018 - 3:37pm
वडवणी, (प्रतिनिधी):- सराफा व्यापार्याने दुकान उघडल्यानंतर साफसफाई करत असतांना २० तोळे सोने व तीस हजार रुपयांची रक्कम असलेली असलेली पिशवी तेथीलच टेबलवर ठेवली असता अज्ञात चोरट्याने पिशवी पळवून नेल्याचा प्रकार आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून चोरट्याचा शोध सुरु केला असुन दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान गेल्या काही दिवसांपासुन शहर आणि परिसरात चोर्यांचे सत्र सुरुच असल्याने व्यापार्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
वडवणी शहरातील मुख्य रस्त्यावर विशाल शिंदे यांचे पार्थ ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. आज सकाळी शिंदे यांनी दुकान उघडून नेहमीप्रमाणे साफसफाई सुरु केली. हातात असलेली २० तोळे सोने व ३० हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी त्यांनी दुकानातील टेबलवर ठेवली. काही क्षणातच अज्ञात चोरट्याने टेबलावरील पिशवी पळवून नेल्याचा प्रकार घडला. टेबलावर पिशवी नसल्याचे पाहून शिंदे यांनी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत चोरट्याने धुम ठोकली होती. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान भरदिवसा दुकानातील २० तोळे सोने असलेली पिशवी लंपास झाल्याने व्यापार्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. महिनाभरापुर्वीच एका व्यापार्याच्या नाकाला गुंगीचे औषध लावून त्यास लुटल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आज पुन्हा सराफा व्यापार्याची लुट झाल्याने खळबळ उडाली आहे.
Add new comment