लाइव न्यूज़
नगराध्यक्षांच्या संकल्पनेला स्वच्छता निरिक्षक गायकवाड यांची साथ
बीडमध्ये ठिकठिकाणी कुंडीत झाडे लावली; दिवसातून दोन वेळा येणार घंटा गाड्या
बीड, (प्रतिनिधी):- नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या संकल्पनेला प्रभारी स्वच्छता निरीक्षक महादेव गायकवाड यांची साथ मिळू लागली आहे. गायकवाड यांनी स्वत: पुढाकार घेत ज्याठिकाणी अस्वच्छता होती तिथे सफाई मोहिम राबवून ठिकठिकाणी कुंडीत झाडे लावली आहेत.
बीड शहरातील जिल्हा रूग्णालय परिसर, बशीरगंज, भाजी मंडई रोड या भागामध्ये ज्या-ज्या ठिकाणी कचरा होता, तो भाग आज सकाळी स्वच्छ करून घेतला आहे. कचर्याच्या ढिगार्यामुळे त्या जागेकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन वेगळा होता. मात्र त्याच जागेला चकचकीत करून त्याठिकाणी कुंडीतील झाडे लावण्याचा प्रयोग स्वच्छता निरीक्षक गायकवाड व त्यांच्या कर्मचार्यांनी यशस्वी केला आहे. आज सकाळी विविध भागामध्ये गायकवाड आणि त्यांच्या टिमने त्या-त्या ठिकाणी जावून स्वत: कुंडीतील झाडे लावली. यावेळी मधुकर यादव, विनोद गायकवाड, विकास साळवे, सचिन क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.या उपक्रमाचे नागरिकातून स्वागत होत आहे. शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावरही गायकवाड यांनी विशेष मोहिम हाती घेतली असून आता दिवसातून दोन वेळा घंटा गाड्या प्रत्येक भागामध्ये जाणार आहे. सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळेत या घंटा गाड्या घरा-घरासमोर जाणार असल्याने नागरिकांनी घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करून टाकावा असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
Add new comment