लाइव न्यूज़
बीडमध्ये विद्यार्थ्यांना आधारची सक्ती करत परिक्षेपासून रोखले
Beed Citizen | Updated: July 14, 2018 - 3:26pm
बीड, (प्रतिनिधी):- गुप्तवार्ता विभाग (एसआयटी)च्यावतीने आज अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची लेखी परिक्षा होती. शहरातील यशवंतराव चव्हाण पॉलटेक्निक कॉलेजमध्ये असलेल्या परिक्षा केंद्राची जबाबदारी खाजगी संस्थेवर सोपविण्यात आली होती. याठिकाणी वेळ झाल्यानंतर पाच मिनिटे उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षेत न बसू देता त्यांना गेटवरच रोखले. एवढेच नव्हे तर एका विद्यार्थीनीला आधार कार्डची सक्ती करत तिलाही परिक्षेपासून रोखले. त्या विद्यार्थीनीकडे आधार कार्डची कलर छायांकित प्रत असूनही तिला जाणीवपुर्वक परिक्षेपासून वंचित ठेवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
बीड शहरातील यशवंतराव चव्हाण पॉलटेक्निक कॉलेजमध्ये आज सकाळी गुप्तवार्ता विभाग (एसआयटी) मधील विविध पदांसाठी परिक्षा झाली. परिक्षा सुरू झाल्यानंतर पाच मिनिटे उशिरा आलेल्या पाच ते सहा विद्यार्थ्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर एका विद्यार्थींनीकडे आधारकार्डची कलर छायांकित प्रत असुनही तिच्याकडे ओरिजनल आधारकार्डची मागणी करण्यात आली. मुलीसोबत तिचे वडिल होते, त्यांनीही त्याठिकाणी नियुक्त देवकर नामक परिक्षाप्रमुखाकडे मुलीला परिक्षेला बसू देण्याची विनंती केली. परिक्षा होताच ओरिजनल आधारकार्ड आणू देवू असेही सांगितले. मात्र तिला परिक्षेला बसू देण्यात आले नाही. पाच मिनिटे उशिर झाल्याने व आधारकार्डची सक्ती करत पाच ते सहा विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. याप्रकरणाची माहिती कळताच शिवसेनेचे युवा नेते के.के.वडमारे, मांगगारुडी समाजाचे जिल्हाध्यक्ष गोरख काळे आदींनी त्याठिकाणी धाव घेवून परिक्षा प्रमुखांकडे संबंधीत मुलीसह अन्य विद्यार्थ्यांना परिक्षेस बसू देण्याची विनंती केली. मात्र त्यांची विनंती धुडकावून लावल्याने संतापलेल्या विद्यार्थी, पालकांनी दुपारी थेट जिल्हाधिकार्यांकडे धाव घेतली.
न्यायालयात दाद मागणार- माऊली जरांगे
राज्यात अनेक परिक्षांमध्ये आधारकार्डची किंवा मतदान ओळखपत्राची छायांकित प्रत ग्राह्य धरून विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रात प्रवेश दिला जातो. विशेष म्हणजे छायांकित प्रतिवरही आधार क्रमांक किंवा ओळखपत्र क्रमांक असतो. एका क्लिकवर त्या क्रमांकाविषयाची सखोल माहिती उपलब्ध होवू शकते. असे असतांना संबंधीत परिक्षाप्रमुखाने केलेला प्रकार संतापजनक आहे. याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असून संबंधीत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे माऊली जरांगे यांनी म्हटले आहे.
परिक्षार्थींना न्याय द्यावा-के.के.वडमारे
ऐन परिक्षेच्यावेळी ओरिजनल आधारकार्डची सक्ती करणे म्हणजे विद्यार्थ्यांना परिक्षेपासून रोखण्याचा प्रकार संताप आणणारा आहे. मुलीच्या वडिलांनी व त्याठिकाणी उपस्थितीत सामाजिक कार्यकर्त्यांनीही परिक्षाप्रमुखांकडे विनंती करून परिक्षार्थ्यांना परिक्षेस बसू द्या अशी मागणी केली. तरीही विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रात जाण्यापासून रोखण्यात आले. जिल्हा प्रशासनाने परिक्षार्थींना न्याय द्यावा अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते के.के.वडमारे यांनी केली आहे.
Add new comment