लाइव न्यूज़
संघाच्या सोशल मीडियाप्रमुखासह चौघेजण राज्यसभेवर
Beed Citizen | Updated: July 14, 2018 - 3:22pm
नवी दिल्ली, (वृत्तसंस्था):- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक आणि सोशल मीडियाप्रमुख राकेश सिन्हा यांच्यासह कामगार नेते राम शकल, मूर्तीकार रघुनाथ महापात्रा आणि प्रसिद्ध नृत्यांगणा सोनल मानसिंह यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या चारही जणांना राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.
२४५ सदस्य संख्या असलेल्या राज्यसभेतील चार जागा रिक्त होत्या. या चारही रिक्त जागा आज अखेर भरण्यात आल्या आहेत. राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलेले सदस्य राकेश सिन्हा हे संघाचे विचारक म्हणून ओळखले जातात. ते संघाचे मीडिया आणि सोशल मीडिया प्रमुखही आहेत. ते वृत्तवाहिन्यांवर संघ आणि भाजपची बाजू जोरकसपणे मांडत असतात. त्यांनी संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचं आत्मचरित्रही लिहिलं असून ’राजनीतिक पत्रकारिता’ या लोकप्रिय पुस्तकाचे ते लेखक आहेत.
तर सोनल मानसिंह या प्रसिद्ध नृत्यांगणा असून त्यांना या आधीच पद्म विभूषण, पद्म भूषण आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. रघुनाथ महापात्रा हे ओडिशातील प्रसिद्ध मूर्तीकार आहेत. त्यांनाही पद्मश्री, पद्म भूषण आणि पद्म विभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आलेलं आहे. तर राम शकल हे प्रसिद्ध कामगार नेते आहेत. ते भाजपचे माजी खासदार असून यूपीच्या रॉबर्टगंज मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले होते. अभिनेत्री रेखा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अनू आगा आणि के. पराशरन यांची कारकिर्द संपल्याने नव्या सदस्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
Add new comment