लाइव न्यूज़
थर्माकोलवर बंदीच; हायकोर्टाचं शिक्कामोर्तब
Beed Citizen | Updated: July 13, 2018 - 3:47pm
मुंबई, (प्रतिनिधी):- पर्यावरणाला हानिकारक गोष्टींना परवानगी देणे शक्य नाही, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं थर्माकोलच्या वस्तू, मखर आणि सजावटीच्या साहित्यावरील बंदी कायम ठेवली आहे. यासंदर्भात सविस्तर आदेश याआधीच दिले असून, विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला आहे, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तसंच थर्माकोल फॅब्रिकेटर अँड डेकोरेटर असोसिएशनची विनंतीही फेटाळून लावली.
गणेशोत्सवासाठी थर्माकोलची घाऊक खरेदी खूप पूर्वी होते आणि राज्य सरकारने मार्चमध्ये बंदी लागू केली. त्यामुळे डेकोरेटर आणि कलाकारांचे मोठे नुकसान होत असल्याने यंदाच्या उत्सवासाठी थर्माकोल वापरण्याची मुभा द्यावी, अशा विनंतीची याचिका थर्माकोल फॅब्रिकेटर अँड डेकोरेटर असोसिएशनने ऍड.मिलिंद परब यांच्यामार्फत न्यायालयाकडे केली होती. गणेशोत्सवातील मखरांसाठी अनेक महिने आधीच घाऊक विक्रेत्यांकडे ऑर्डर येतात आणि त्याप्रमाणे मखर तयार करण्याकरिता घाऊक विक्रेत्यांकडून खूप पूर्वीच थर्माकोलची खरेदी होते. यानुसार, कलाकारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक यापूर्वीच केली आहे. पण बंदीमुळे त्यांचे मोठे नुकसान होईल. गणेशोत्सव संपण्याच्या दहा दिवसांच्या आत थर्माकोलचा मखर परत मिळाल्यास पाच टक्के रक्कम परत केली जाईल, असा उपक्रम राबवण्याचा मानस आहे. त्याचबरोबर उत्पादकांनीही प्रदूषण न करता थर्माकोलची विल्हेवाट लावण्याचे आश्वासन दिले आहे, असे म्हणणे याचिकादारांनी मांडले होते. मात्र, याविषयी न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने सुनावणीअंती याचिका फेटाळून लावली.
Add new comment