लाइव न्यूज़
माजलगावमध्ये शेतकरी आक्रमक; बँकेला कुलूप ठोकले
पिकविम्याची रक्कम कर्जखाती वर्ग करु नका-थावरे
माजलगाव, (प्रतिनिधी):- पिक विम्याची रक्कम कर्ज खात्यात वर्ग केल्याने आक्रमक झालेल्या शेतकर्यांनी भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला कुलूप ठोकले. पिकविम्याची रक्कम वर्ग न करता ती शेतकर्यांना द्यावी त्याचबरोबर पिककर्जही तात्काळ वाटप करावे अशी मागणी यावेळी शेतकर्यांनी केली.
माजलगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत अधिकारी, कर्मचारी शेतकर्यांची अडवणूक करतर असुन पिकविम्याचे आलेले पैसे शेतकर्यांच्या कर्जखाती वर्ग केल्याने आक्रमक झालेल्या शेतकर्यांनी शेतकरी नेते भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली बँकेसमोर गर्दी केली. शेतकर्यांची होणारी अडवणूक थांबवा, पिकविम्याचे पैसे संबंधित शेतकर्यांना तात्काळ द्या अशा घोषणा देत शेतकर्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला कुलूप ठोकले. बँक प्रशासन जोपर्यंत दखल घेणार नाही तोपर्यंत बँकेच्या दारातच शेतकर्यांनी ठिय्या मांडला होता. यावेळी बँकेच्या धोरणाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माजलगाव तालुक्यातील २१ गावांमधील शेतकर्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप करत जिल्ह्यातील बँकांकडूनही अशाच पद्धतीने पिकविम्याची रक्कम कर्जखाती वळविण्यात येत असल्याचा आरोप भाई थावरे यांनी केला. या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Add new comment