लाइव न्यूज़
अल्पकालीन चर्चेत राईनपाडा हत्याकांडावर धनंजय मुंडेंचे सरकारवर शरसंधान
Beed Citizen | Updated: July 11, 2018 - 3:30pm
जे संविधान बदलाची भाषा करतात ते भटके समाज चिरडायला मागेपुढे पाहणार नाहीत
नागपूर, (प्रतिनिधी):- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी बसले तो पक्ष आणि त्यांचे मंत्री संविधान बदलायला निघाले आहेत तिथे हे भटके समाज चिरडून टाकायला मागेपुढे पाहणार नाहीत अशी मानसिकता वाढीस लागली असून ही मानसिकता ठेचून काढण्याची गरज आहे अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राईनपाडा घटनेवर आपला संताप व्यक्त केला आणि सरकारच्या अपयशावर जोरदार हल्लाबोलही केला.
अल्पकालीन नियम ९७ अन्वये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धुळे जिल्हयातील साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात हिंसक जमावाने केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला तो विषय लावून धरला.
शाहू,फुले,आंबेडकरांच्या पुरोगामी आणि प्रगतशील महाराष्ट्रासाठी राईनपाडाची घटना अत्यंत लाजीरवाणी आहे.समाजातील गरीब,दुर्बल,वंचित आणि उपेक्षित घटकातील या पाच जणांची इतक्या अमानुषपणे हत्या होते परंतु समाजातून दबका आवाज वगळता निषेधाचा तीव्र सूर उमटत नाही अशी खंतही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
अफवेच्या गैरसमजातून पाच जणांना ठेचून मारले जाते.अशा हत्या करण्यास समाज किंवा जमाव का तयार होत आहे याचा विचार करुन ही प्रवृत्ती ठेचून काढण्याची गरज असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.
पाच निरपराधांना कोंडून त्यांची ठेचून हत्या जमाव करतो या जामावाला कायदयाची भीती का वाटत नाही.अशी हत्या करण्यास समाज का प्रवृत होतो.या झुंडशाही मागचा मास्टमाईंड,यामागची विचारसरणी शोधावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
राईनपाडा येथे घडलेली घटना ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे.या घटनेनं सरकारचं अपयश स्पष्ट केलं आहे.संपूर्ण समाजात झुंडशाही,गुंडशाही,पुंडशाही बोकाळली आहे त्यात समाजाला मदत करणारे हात अदृष्य झाले आहेत.यापूर्वीही अशा घटना घडल्या परंतु त्या गर्दीतून आवरणारे,सावरणारे हात पुढे यायचे पण आज असा एकही हात गर्दीतून पुढे येत नाही ही गंभीर बाब असल्याची भीती धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
काही घटकांकडे पोट भरण्याची साधनं नसतील तर चोर्या,लूटमार करुन पोट भरण्यापेक्षा भीक मागून जगणं हा गुन्हा आहे का?असा सवाल करतानाच समाजातील या दुर्बल घटकांना संरक्षण देण्यास सरकार कमी पडले आहे हे या घटनेवरुन समोर येत आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.
राईनपाडा प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या मार्फत डखढ चौकशी करावी , या खटल्याची सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्यात यावी, या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रु व कुटुंबातील व्यक्तीस नौकरी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
अफवा पसरवीणा-या सोशल मीडियाच्या अतिरेकाला आळा घालणारा कायदा करण्याची मागणीही त्यांनी केली.
Add new comment