लाइव न्यूज़
बीडमध्ये मोफत पुस्तक वाटपात घोळ
खाजगी संस्थांशी साटेलोटे; जिल्हा परिषदेसह अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तकेच मिळाली नाही
बीड, (प्रतिनिधी):- सर्व शिक्षा अभियानातर्ंगत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजना राबवली जाते. यावर्षीही शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवसांपासुन पुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार बहुतांश शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली असली तरी यामध्ये मोठा घोळ असल्याची चर्चा शिक्षकांमध्येच होवू लागली आहे. पुस्तक वाटपाची जबाबदारी असलेल्या काहीनीं खासगी संस्थांशी साटेलोटे केल्यानेच जिल्हा परिषदेसह अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तकेच मिळाली नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे, शिक्षणाधिकार्यांकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी आलेल्या आहेत. या प्रकरणात शिक्षणाधिकार्यांनी संबंधित व्यक्तींना बोलावून त्याचा जाब विचारल्याचेही समजते.
बीड तालुक्यात सर्व शिक्षा अभियानातर्ंगत मोफत पाठ्यपुस्तक योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याची चर्चा आहे. ज्या व्यक्तींवर पुस्तक वाटपाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यातील काहीनीं खाजगी परंतु विना अनुदानित शाळांना, तुकड्यांनाही पुस्तके दिल्याची चर्चा शिक्षकांमध्ये होवू लागली आहे. एखाद्या शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग अनुदानित असतांना त्याठिकाणी सरसकट पहिली ते आठवीपर्यंत पुस्तके दिली आहेत. एखाद्या अनुदानित वर्गाची ४० विद्यार्थी संख्या असतांना त्याला जोडूनच असलेल्या विनाअनुदानित तुकडीचे पुस्तकेही काही संस्थांच्या शाळांना देण्यात आलेली आहेत. सदरील पुस्तके केवळ अनुदानित शाळांना देणे बंधनकारक असतांना विनाअनुदानित शाळा आणि तुकड्यांना पुस्तके वाटप झालीच कशी? यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचाही संशयही व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या काही शाळांनाही पुस्तके न मिळाल्याच्या तक्रारी होवू लागल्या आहेत. काही विषयांची पुस्तके मिळाली असली तरी भुगोलसह अन्य काही विषयांची पुस्तके मात्र वरुनच आली नसल्याचे सांगितले जात आहे. शाळा सुरु होवून महिना उलटला तरीही काही विषयांची पुस्तके का आली नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मराठी, उर्दू, सेमी आदि माध्यमांच्या बाबतीत हाच प्रकार घडला आहे. त्यामुळे खासगी संस्थांच्या काही अनुदानित आणि जिल्हा परिषदेच्या काही शाळांमधील विद्यार्थ्यांनाही पुस्तके मिळाली नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वृक्ष लागवड मोहिमेतर्ंगत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी काही शाळांना भेटी दिल्या असत्या त्याठिकाणीही काही विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर शिक्षणाधिकार्यांनी गटशिक्षण कार्यालयातील पुस्तक वाटपाशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचार्यांना बोलावून घेत या प्रकाराचा जाब विचारलेला आहे. या सर्व प्रकारावरुन बीड तालुक्यात मोफत पुस्तक वाटप योजनेमध्ये घोळ झाल्याची चर्चा होत आहे.
पुस्तक वाटपाशी संबंधित अधिकारी, कर्मचार्यांची चौकशी करा
ऍड.अजित देशमुखांची
बीडमध्ये मोफत पाठ्य पुस्तक योजनेत मोठा घोळ झाल्याची तक्रार सर्व प्रथम भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे ऍड.अजित देशमुख यांनी केलेली आहे. मोफत पाठ्यपुस्तक योजनेशी संबंधित अधिकारी, कर्मचार्यांची तात्काळ चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ऍड.देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाकडे केलेली आहे.
पुस्तके कमी आली तर त्याचा भुर्दंड विद्यार्थ्यांच्या माथी का?
मोफत पाठ्यपुस्तक योजनेतर्ंगत नियमानुसार शाळांना पुस्तके वाटप केली असती तर आज विद्यार्थ्यांना पुस्तके कमी पडली नसती असे बोलले जात आहे. पाठ्यपुस्तक वाटपासंदर्भात तक्रारी वाढू लागताच वरुनच पुस्तके कमी असल्याचे सांगितले जात आहे. गटशिक्षण विभागाने एकुण १३७७६ पुस्तके कमी असल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये विविध वर्गाच्या विषयांचा समावेश असल्याचेही दाखवले जात आहे. पुस्तके कमी आली आहेत तर त्याचा भुर्दंड विद्यार्थ्यांच्या माथी का? असा प्रश्न पालकातून उपस्थित होत आहे. मागणी आणि प्राप्त पुस्तक संख्या याचे योग्य नियोजन झाले असते तर पुस्तक कमी पडले नसते असेही पालकवर्गातून बोलले जात आहे.
Add new comment