बीडमधील शिक्षक नेते श्रीराम आघाव यांचे निधन कास्ट्राईब संघटनेचे लढवय्ये नेतृत्व हरपले

बीड, (प्रतिनिधी):- येथील शिक्षक नेते तथा कास्ट्राईब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीराम भुजंगराव आघाव यांचे आज सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. वंजारवाडी फाट्यावर त्यांच्या मोटारसायकलला शनिवारी ट्रकने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. बीड शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. कास्ट्राईब संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मोठे संघटन उभे करत कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांवर सातत्याने आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. त्यांच्या निधनाने संघटनेचे लढवय्ये नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होवू लागली आहे.
बीड येथील राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे उपाध्यक्ष श्रीराम भुजंगराव आघाव हे शनिवारी सकाळी वंजारवाडी फाट्यावर एका अपघातात जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरु असतांना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे व वंजारवाडीचे सरपंच वैजिनाथ तांदळे, जगन्नाथ तांदळे यांचे ते भाच्चे होत. आज दुपारी वंजारवाडी या त्यांच्या मुळगावी श्रीराम आघाव यांच्यावर शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आघाव कुटूंबियांच्या दु:खात सिटीझन परिवार सहभागी आहे.
 
‘ते’ निवेदन ठरले शेवटचे..!
कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य उपाध्यक्ष श्रीराम आघाव सातत्याने कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नावर आक्रमक होत असत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करण्यात ते नेहमीच अग्रेसर होते. दि.२ जुलै रोजी महासंघाच्यावतीने आघाव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देवून शिक्षक बदलीतील संवर्ग १ व २ चा लाभ घेतलेल्या शिक्षकांची चौकशी करून चुकीची माहिती भरणार्‍यांवर कडक कारवाईची मागणी केली होती. तसेच त्यांच्या जागी विस्थापित झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत पाठपुरावा केला होता. श्रीराम आघाव यांचे हे निवेदन शेवटचे ठरले. एवढेच नव्हे तर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी खुल्या प्रवर्गातील ६५ हजार विद्यार्थ्यांना लोकसहभागातून गणवेश वाटपाचा मुद्दा पुढेे केल्यानंतर आघाव यांनी स्वत: या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शविली होती.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.