लातुरातील अविनाश चव्हाण हत्या प्रकरणाचं गूढ उकललं!

लातूर : ‘स्टेप बाय स्टेप’ क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येचं गूढ उकललं आहे. अविनाश चव्हाण यांची हत्या व्यावसायिक वादातूनच झाल्याचं उघड झालं आहे. ‘कुमार मॅथ्स’ क्लासेसचे संचालक चंदनकुमार यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अविनाश चव्हाण यांच्या हत्येसाठी चंदनकुमार शर्मा यांनी 20 लाखांची सुपारी दिल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

कोण आहे चंदनकुमार शर्मा?

मुख्य आरोपी चंदनकुमार शर्मा हा मूळचा बिहारमधील असून, गेल्या अनेक वर्षांपासून लातूर येथे राहत आहे. बी मॅक झालेला चंदनकुमार हा ‘कुमार मॅथ्स’ नावाने क्लास चालवत होता.

आणि दोघांमधील वाद वाढला!

विशेष म्हणजे चंदनकुमार अविनाश चव्हाण यांचा व्यवसायातील पार्टनर होता. क्लासमध्ये केवळ सात विद्यार्थी होते. मग अविनाश त्यात आला आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढली. नंतर अविनाश वेगळा झाला आणि ‘स्टेप बाय स्टेप’ क्लास सुरु केले. यातूनच दोघांमधील वाद वाढला.

हत्येची सुपारी ते हत्या....

चंदनकुमार शर्मा याने महेशचंद्र गोगडे रेड्डी याला अविनाश चव्हाण यांच्या हत्येची सुपारी दिली. महेशचंद्रने शरद घुमे याला हे काम सोपवले. शरद घुमेने त्याच्या गावात राहणाऱ्या करण सिंग घहीरवाल याला सोबत घेतले आणि अविनाश चव्हाणांवर गोळीबार केला.

चंदनकुमार याने 20 लाख रुपयांची सुपारी दिली. त्यातील साडेआठ लाख रुपये देण्यात आले होते.

हत्येसाठी शस्तर परळी येथील इराणी माणसाने बिहारमधून मिळवून दिले. पंधरा राऊंडची एक पिस्तूल आणण्यात आली.

दुसऱ्याच्या गाडीवरुन रेकी करण्यात आली. त्यानंतर पाठलाग करुन अविनाश चव्हाणांच्या गाडीजवळ आले आणि पार्किंग लाइट ऑन करुन  बोलत असताना करणने गोळी चालवली. त्यात अविनाश चव्हाण यांचा मृत्यू झाला.

काय झालं त्या दिवशी?

लातुरातील प्रसिद्ध अशा ‘स्टेप बाय स्टेप’ क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांची 24 जूनच्या रात्री हत्या झाली. आपल्या घराकडे जात असताना शिवाजी शाळेजवळ त्यांच्या गाडीवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यात एक गोळी त्याच्या उजव्या छातीत लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अविनाश चव्हाण स्वत:च गाडी चालवत होते. यावेळी गाडीत ते एकटेच होते. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. चव्हाण यांच्यावर हल्ल्यासाठी हल्लेखोर दबा धरुन बसला होता की त्यांचा पाठलाग करत होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, डीवायएसपी हिंमत जाधव, डीवायएसपी गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय सुधाकर बावकर, पीआय केशव लटपटे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी हजर होते.

अविनाश चव्हाण यांची हत्या आणि क्लासेसची स्पर्धा

शिक्षणामुळे प्रगती होते हे खरं असलं, तरी त्याच शिक्षणाला पैशांचा दर्प आला की, काही तरी अघटित घडणार हे निश्चित असतं. लातूरमध्ये असंच काहीसं झालं. ज्याने विद्यार्थ्यांच्या बक्षिसांवर एक कोटी रुपये खर्च केले. ज्याने जिमच्या उद्घाटनासाठी सनी लिओनीला लातूरमध्ये आणलं होतं, त्या अविनाश चव्हाण यांची हत्या झाली आहे.

12 जून 2018 रोजी 'स्टेप बाय स्टेप' क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांनी गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करताना तब्बल एक कोटी रुपयांची बक्षीसं वाटली होती. त्यानंतर बरोबर 13 दिवसानंतर अविनाशची रात्री दीड वाजता दोन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गेल्या वर्षी 31 मे रोजी अविनाशनं आपल्या जिमच्या उद्गाटनासाठी सनी लिओनिला खास विमानानं लातूरला आणलं होतं. तेव्हापासून अविनाश चव्हाण चर्चेत होते.



निवृत्त पोलिसाचा मुलगा असलेल्या अविनाश यांनी दोन वर्षांपूर्वी खाजगी शिकवणी सुरु केली. त्यातून आलेल्या पैश्यातून लातूर शहरात मुख्य रस्त्यावर जिम सुरु केलं. नांदेडच्या शाखेचं कामही जोरात सुरु होतं.

लातूर पॅटर्नचा गवगवा झाल्यापासून लातूर शहरात सुमारे 100 शिकवण्या सुरु झाल्या आहेत. नियमित आणि पुन्हा परीक्षा देणारे असे 25 हजार विद्यार्थी या शहरात शिकतात. तीन विषयांसाठी मिळून प्रत्येक विद्यार्थ्याला 50 हजार फिस द्यावी लागते. त्यातून सुमारे 1200 कोटींचा बेबंद व्यवहार होतो. कोणताही शिकवणीवाला कसलाच कर भरत नाही. या साम्राज्यात कोणीची भर होऊ नये यासाठी प्रसंगी क्लास चालकांमध्ये हाणामारीचे आणि तणावाचे नित्य नेमाने प्रकार घडतात. क्लास चालकांकडून खंडणी उकळणारी समांतर टोळ्या इथे काम करतात.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.