लाइव न्यूज़
खा.ओवेसी म्हणाले, निजाम अध्यक्ष होते आहेत आणि राहणारच
एमआयएमचे कमबॅक; निजाम यांना पुन्हा ताकद
बीड, (प्रतिनिधी): नगरपालिका निवडणुकीनंतर पक्षांत निर्माण झालेल्या गटतटामुळे आणि आर्थिक तडजोडीच्या आरोपांमुळे एमआयएमची प्रतिमा मलिन झाली होती. मात्र काल झालेल्या खा.ओवेसींच्या तडाखेबाज सभेमुळे एमआयएमचे जोरदार कमबॅक झाले आहे. एवढेच नव्हे तर ‘निजाम हटाव’ च्या घोषणा देणार्यानंाही खा.ओवेसी यांनी करारा जवाब दिला. त्यामुळे जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांना पुन्हा ताकद मिळाली आहे.
बीडमध्ये रात्री एमआयएमच्या वतीने तहफूज-ए-शरीयत व संविधान बचाओ कार्यक्रमात आ.ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर सडकून टिका केली. क्षीरसागरांचा नामोल्लेख टाळत भूत बंगला म्हणून उल्लेख केला. शरीयत मध्ये हस्तक्षेप करणार्या मोदी सरकारलाही त्यांनी ठणकावले. मुस्लिम आणि दलितांवर होणार्या अन्याय अत्याचाराच्या प्रश्नावर लोकशाही मार्गाने लढा उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात काही तरूण निजाम हटावच्या घोषणा देत होते. खा. ओवेसी यांनी आपले भाषण थांबवत, ‘खामोश हो जाओ’ असा सज्जड दम दिला. त्यानंतर भाषणाच्या शेवटी स्वतंत्र गटाला उद्देशून खा.ओवेसी म्हणाले, निजाम जिल्हाध्यक्ष होते, आहेत आणि राहणारच. तुम्हाला यायचे असेल तर गट बरखास्त करा आणि बिनशर्त मजलिसमध्ये परत या. मी तुम्हाला छातीस लावण्यास तयार आहे, असे आवाहनही केले. खा.ओवेसी यांच्या या आवाहनामुळे निजाम यांच्या विरोधकांना मुँहतोड जवाब मिळाला असून आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठी ताकदही शेख निजाम यांना मिळाली आहे. एवढेच नव्हे तर नगर पालिका निवडणुकीनंतर घडलेल्या घडामोडींमुळे एमआयएमची मलिन झालेली प्रतिमा या सभेनेपुन्हा उजळली असून जिल्ह्याच्या राजकारणात एमआयएमचे जोरदार कमबॅक झाले आहे.
स्वतंत्र गट संधीचं सोनं करणार का?
एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.ओवेसी यांनी जाहिर सभेतून स्वतंत्र गटातील सदस्यांना आवाहन करत पुन्हा मजलिसमध्ये बिनशर्त परत या, मी तुम्हाला छातीस लावण्यास तयार आहे, असे सांगितले. पालिका निवडणुकीनंतर सदस्यांनी घेतलेली भुमिका, त्यांच्यावर झालेले आरोप-प्रत्यारोप आणि जनतेचा रोष बाजुला ठेवून खा. ओवेसी यांनी मनाचा मोठेपणा दाखवत, स्वतंत्र गटाला साद घातली आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वतंत्र गट या संधीचं सोनं करेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Add new comment