महसूल मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी घेतले लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन

मुंडे साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्याचा केला संकल्प 
गड परिसरात लवकरच बांधणार सुसज्ज विश्रामगृह ; टोकवाडी - नागापूर रस्ता होणार राज्य मार्ग  
परळी, (प्रतिनिधी):- राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि महसूल मंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांनी आज सकाळी सपत्निक गोपीनाथ गडावर जावून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या साथीने मुंडे साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण कटीबध्द आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, गोपीनाथ गड परिसरात शासकीय जागेवर लवकरच सुसज्ज विश्रामगृह बांधणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.  
   लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तीन जून रोजी झालेल्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना कांही अडचणींमुळे उपस्थित राहता आले नव्हते, त्यामुळे आज मुद्दामहून ते  समाधीचे दर्शन घेण्यासाठी गोपीनाथ गडावर आले होते. काल संध्याकाळी त्यांचे परळी येथे यशःश्री निवासस्थानी आगमन झाले, खा. डॉ.प्रितमताई मुंडे व भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. 
 आज सकाळी चंद्रकांत पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी अंजली पाटील यांनी गोपीनाथ गडावर जावून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. गड परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने खा. डॉ प्रितमताई मुंडे यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. गड परिसराची पाहणी करून त्यांनी मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. गड परिसर चांगल्या प्रकारे विकसित केल्याबद्दल त्यांची ना  पंकजाताई मुंडे यांचे कौतुक केले. मुंडे साहेब भाजपचे एक प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांच्याकडून आम्ही खूप कांही शिकलो. तळागाळातील माणसांसाठी त्यांनी केलेले काम पुढे नेण्यासाठी तसेच त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे यांच्या साथीने आम्ही कटीबध्द आहोत असे ते यावेळी म्हणाले. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.