लाइव न्यूज़
स्वबळावरच लढणार; अमित शाहांच्या ‘मातोश्री’ वारीनंतरही शिवसेना ठाम
Beed Citizen | Updated: June 7, 2018 - 3:32pm
मुंबई, (प्रतिनिधी):- शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असली तरी शिवसेनेचा आक्रमक पवित्रा कायम आहे. शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय आधीच घेतला असून तसा ठराव देखील पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. आता या निर्णयात बदल होणार नाही, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
भाजपावर नाराज होऊन स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक असल्याचे वृत्तही समोर आले. दुखावलेल्या दोन्ही पक्षांमध्ये या भेटीनंतर समेटाची स्पष्ट चिन्हे निर्माण झाली होती. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये आणखी भेटीगाठी होणार असल्याचे सांगण्यात आले.
या घडामोडी ताज्या असतानाच गुरुवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला अमित शाह- उद्धव ठाकरे भेटीवर प्रतिक्रिया दिली. ‘आम्हाला अमित शाह यांच्या अजेंड्याची माहिती आहे. पण शिवसेनेने यापुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचा ठराव मंजूर केला आहे. आता हा निर्णय बदलणार नाही’, असे संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेना स्वबळावर लढणार, असे संजय राऊत यांनी म्हटल्याने शिवसेनेच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आता भाजपाकडून याबाबत काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Add new comment