उपनगराध्यक्षांसह दहा नगरसेवकांच्या अपात्रतेच्या निर्णयाला कोर्टाची स्थगिती

बीड, (प्रतिनिधी):- नगर विकास राज्यमंत्र्यांनी कचराफेक प्रकरणात उपनगराध्यक्षांसह दहा नगरसेवकांना अपात्र ठरवल्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाचे स्थगिती आदेश असतांनाही निर्णय दिल्याने नगरविकास मंत्र्यांना फटकारत दहा जणांना दि.६ जूनपर्यंत दिलासा दिला आहे. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयाने आघाडीची विस्कटलेली घडी पुन्हा बसली असुन नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्यासह समर्थकांना दणका बसला आहे. काकु-नाना विकास आघाडीच्या नेत्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
बीड नगरपालिकेत नगराध्यक्षांच्या कॅबिनमध्ये कचरा फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उपनगराध्यक्षांसह दहा सदस्यांना अपात्र ठरविण्याबाबत गणेश वाघमारे यांनी न्यायालयात  याचिका दाखल केली होती. सदरील प्रकरणात नगरविकास राज्यमंत्री रंजित पाटील यांनी बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदानापुर्वी निर्णय देत उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, अमर नाईकवाडे, फारुख पटेल, प्रभाकर पोपळे, रंजित बनसोडे, रमेश चव्हाण, युवराज जगताप, इद्रिस हाश्मी, मोमीन अजरोद्दीन, सम्राटसिंह चौहान या दहा जणांना अपात्र ठरविले होते. कचरा फेकून गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिलेल्या या निर्णयामुळे काकु-नाना विकास आघाडीला मोठा धक्का बसला होता. अपात्रतेच्या निर्णयाविरुद्ध काकु-नाना विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात औरंगाबाद न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्या.मंगेश पाटील यांनी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्यासह दहा नगरसेवकांच्या अपात्रतेच्या निर्णयाला दि.६ जून २०१८ पर्यंत स्थगिती दिली आहे. न्यायालयाचे स्थगिती आदेश असतांनाही या प्रकरणात नगरविकास विभागाने निर्णय दिल्याचे न्यायालयाने नमुद केले आहे. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयाने काकु-नाना विकास आघाडीची विस्कटलेली घडी पुन्हा बसली असुन अपात्रतेच्या निर्णयाने सुखावलेल्या डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्यासह त्यांच्या समर्थकांना मोठा दणका बसला आहे.
अमर नाईकवाडे म्हणाले, साजिशे लाख बनती है...!
न्यायालयाने काकु-नाना विकास आघाडीच्या उपनगराध्यक्षांसह दहा सदस्यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर आघाडीचे नेते अमर नाईकवाडे यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. अमर नाईकवाडे यांनी आपल्या फेसबुकवॉलवरुन पोस्ट करत ‘साजिशे लाख बनती है मेरी हस्ती मिटाने की, बस दुवाए आपकी उन्हे मुकम्मल नहीं होने देती’ असे नमुद करत जनतेचा आर्शिवाद आपल्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले आहे.
बीडचे ऍड.सय्यद तौसिफ यांनी मांडली बाजू
 
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आघाडीच्या नगरसेवकांनी दाखल केलेल्या याचिका प्रकरणात बीड येथील ऍड.सय्यद तौसिफ यांनी त्यांची बाजू मांडली. ऍड.तौसिफ यांनी केलेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने नगरसेवकांच्या अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती दिली.
 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.