दोन दिग्गज ओबीसी नेत्यांची भेट ; मुंबईत आ. क्षीरसागरांनी घेतली भुजबळांची भेट
बीड ( प्रतिनिधी ) राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते आ. जयदत्त क्षीरसागर आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज दोन वर्षांनंतर भेटले. आ. क्षीरसागर यांनी दुपारी भुजबळ यांची निवासस्थानी भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.तासभराच्या चर्चेत दोघांनी विविध विषयांवर गप्पा मारल्या. ' प्रकृतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा ' अशा सदिच्छा देत क्षीरसागर यांनी त्यांचा निरोप घेतला. दरम्यान जामीन मिळाल्यानंतर भुजबळ यांच्यासोबत झालेली ही क्षीरसागरांची पहिलीच भेट असून दोघांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील समोर आला नसला तरी भुजबळांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच ही भेट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबईतील निवासस्थानी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी आज ( शुक्रवार ) दुपारी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी क्षीरसागर यांनी भुजबळांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांच्या आजाराविषयी जाणून घेत डॉक्टरांकडून झालेल्या उपचाराची माहिती घेतली. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. ' प्रकृतीची काळजी घ्या ' असा सल्ला देतानाच ' लवकर बरे व्हा ' अशी सदिच्छा देत क्षीरसागर यांनी भुजबळांचा निरोप घेतला. राज्याच्या राजकारणातील दोन दिग्गज ओबीसी नेते म्हणून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि आ. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते म्हणून दोघांची ख्याती आहे. भुजबळ आणि क्षीरसागर यांनी आपापल्या जिल्ह्यात मजबूत कमांड मिळवलेली असली तरी अलीकडच्या काळात भुजबळ गैरव्यवहारप्रकरणातील आरोपाने अडचणीत आले होते तर क्षीरसागर गृहकलहामुळे अस्वस्थ झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आज झालेली भेट सर्वांचे लक्ष वेधणारी असली तरी ही भेट भुजबळ यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठीच होती असे सांगितले जात आहे.
Add new comment