बीडच्या विमा योजनेची यशस्वी गाथा ओरिसात !
परराज्याला बीड पॅटर्नची भुरळ ; भुवनेश्वरमध्ये जिल्हाधिकारी देवेंद्रसिंहांकडून मार्गदर्शन
चंदन पठाण | बीड
प्रधानमंत्री फसल बिमा योजनेतील उत्कृष्ट कामगिरीच्या अवार्डने जिल्हा प्रशासनाचा गौरव झाला. त्यांनतर देशात जिल्ह्याची मान उंचावली असून योजनेच्या यशस्वितेची गाथा थेट ओरिसापर्यंत पोहचली आहे. परराज्यालाही बीड पॅटर्नची भुरळ पडली असून भुवनेश्वर ( ओरिसा ) येथे काल दि. १० मे रोजी बीडचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी उपस्थित अधिकार्यांना योजना राबविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी ओरिसा राज्याच्या सहकार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती रंजना चोप्रा यांच्यासह सहकारी संस्थांचे प्रधान सचिव डॉ. त्रिबिकराम , सर्व उपनिबंधक ,बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
बीड जिल्हा प्रशासनाला विमा योजनेतील उत्कृष्ट कामगिरी बद्दल ’ प्रधानमंत्री अवॉर्ड ’ ने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांचा दिल्लीत गौरव झाल्यानंतर सदरील योजना राबविण्यासंदर्भात त्यातील बारकावे आणि त्याच्या अंमलबजावणी प्रक्रियेतील नियोजन याची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना पर राज्यातून बोलावणे येत आहे. ओरिसा राज्यातही प्रधानमंत्री फसल विमा योजना यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासंबंधी बीडच्या जिल्हाधिकार्यांना विनंती करण्यात आली होती. दि. १० मे रोजी ओरिसातील भुवनेश्वर येथे जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी राज्याच्या सहकार विभागातील प्रधान सचिव श्रीमती रंजना चोप्रा , सहकारी संस्थांचे प्रधान सचिव डॉ. त्रिबिकराम यांच्यासह सर्व उपनिबंधक , सहाय्यक उपनिबंधक , सहकारी बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अन्य अधिकारी आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी विमा योजनेची अंमलबजावणीसाठी करावे लागणारे नियोजन , बँकांची भूमिका आणि कार्ये , प्रशासनाची जबाबदारी, जनजागृती आदींविषयी उपस्थित अधिकार्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात जिल्हा प्रशासन नेहमीच अग्रभागी राहिले असून प्रशासन म्हणून केलेल्या सांघिक कामगिरीची दखल केंद्राने आणि राज्याने वेळोवेळी घेतलेली आहे. येथील वेगवेगळे पॅटर्न राज्यातील इतर जिल्ह्याने घेतलेले असून विमा योजनेच्या माध्यमातून हा पॅटर्न देशात पोहचला आहे.
Add new comment