एसपी ऑफीसमध्येच तरूणाचा गोंधळ

मुलीचा पाठलाग करत एसपी ऑफिस गाठले; त्याला रोखणार्‍या पोलिसावर कत्तीने हल्ला
बीड, (प्रतिनिधी):- ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु मला आवडते, माझ्याशी लग्न कर’ असे म्हणत बसस्थानकासमोर पुण्याहून येणार्‍या आईची वाट पाहत थांबलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत मारहाण केल्याची घटना आज सकाळी बसस्थानकासमोर खाजगी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर घडली. सदरील प्रकरणाने अल्पवयीन मुलगी भयभीत होऊन सरळ एसपी कार्यालयात पळून गेली असता आरोपीही तिच्या पाठीमागे एसपी कार्यालयात गेला होता. कार्यालयातील पोलिसांनी आरोपीस अडविण्याचा प्रयत्न केला असता एका पोलिस कर्मचार्‍यावर कत्तीने वार करत एसपी ऑफिसमध्ये लावलेल्या झाडांची तोडफोड करीत तेथून पसार झाल्याची घटना घडली. या प्रकरणाने शहरात एकच खळबळ उडाली असुन एसपी कार्यालयात तोडफोड करुन आरोपी फरार कसा होतो असा प्रश्‍न निर्माण होत आहे.
शहरातील बलभीमनगर भागातील एक १६ वर्षीय मुलगी पुण्याहून आई येणार असल्याने बसस्थानका आज सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान खाजगी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर बसची वाट पाहत होती. त्याठिकाणी आरोपी एरार हाश्मी हा आला त्या मुलीजवळ येताच ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, तु मला आवडतेच, माझ्याशी लग्न कर म्हणत’ छेडछाड करु लागला. त्याला त्या मुलीने कोणतेही प्रतिउत्तर न दिल्याने हाश्मी याने मुलीस मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकाराने घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने सरळ एसपी कार्यालय गाठले. परंतु बेभान झालेला हाश्मी थेट त्या मुलीच्या पाठीमागे एसपी कार्यालयात गेला. तिथे असलेल्या कर्मचार्‍यांना मुलीने आपबिती सांगितली. त्यातच तिथे आलेल्या एरार हाश्मीला पोलिस कर्मचार्‍यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सुशिलकुमार कोळेकर या पोलिस कर्मचार्‍यावर हाश्मीने कत्तीने वार करत जखमी केले. त्यानंतर कार्यालयात लावलेल्या झाडांची नासधुस करत तेथून फरार झाला. सदरील प्रकरणाने एसपी कार्यालयातही गोंधळ निर्माण झाला होता. सकाळची वेळ असल्याने कार्यालयात मोजकेच कर्मचारी उपलब्ध होते. परंतु माथेफिरु एरार हाश्मीला पकडण्याचे धाडस कोणीही दाखवले नाही. कार्यालयात तोडफाेड करत एरार हाश्मी तेथून पसार झाला. या प्रकरणी त्याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कलम ३५४, ८ (१२) प्रमाणे गुन्हा नोंद झाला असुन शहर पोलिस ठाण्यातही कलम ३०७ व ३५३ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदरील घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.