जामखेडमधील दुहेरी हत्याकांड; कडकडीत बंद
जामखेड, (प्रतिनिधी):- येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी योगेश राळेभात आणि राकेश राळेभात या दोघांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. आज दुपारी उशिरापर्यंत दोघांचेही मृतदेह शहरात आणण्यात आले नव्हते. दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सकाळपासुनच शहर कडकडीत बंद होते. सर्वत्र तणावाची परिस्थिती होती. अहमदनगर येथून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला होता. दरम्यान जिल्ह्यात घडणार्या हत्याकांडाच्या घटनांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असुन नागरिकांमधुन संताप व्यक्त होत आहे. राकेश आणि योगेश राळेभात यांच्या हत्याप्रकरणातील मारेकर्यांची काही महत्वाची धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे सुत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते योगेश अंबादास राळेभात आणि राकेश अर्जुन राळेभात या दोघांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जामखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शहरातील वातावरण तणावग्रस्त असून, मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजकीय फलक लावण्यावरून गेल्या वर्षी झालेल्या वादातून या हत्या झाल्याची तक्रार योगेश राळेभातचा भाऊ कृष्णा राळेभात यांनी दिली आहे. या प्रकरणी गोविंद दत्ता गायकवाड (रा.तेलंगशी) याच्यासह इतर ४ ते ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश आणि राकेश या दोघांच्या हत्येप्रकरणी काही महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असुन गतीने तपास सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ जामखेड शहर सकाळपासुनच कडकडीत बंद होते. रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट दिसुन आला.
पालकमंत्र्यांसमोर नातेवाईकांचा संताप; ना.शिंदे पाठीमागच्या दाराने बाहेर पडले
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांचा जामखेड हा मतदार संघ आहे. पालकमंत्री शिंदे हे घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांना नातेवाइकांच्या संतापाचा सामना करावा लागला. पालकमंत्री रुग्णालयामध्ये थांबले असताना नातेवाईकांनी रुग्णालयाच्या दोन्ही मुख्य प्रवेशद्वारांवर गर्दी केली. त्यामुळे पालकमंत्री शिंदे हे रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूला असणार्या दाराने बाहेर पडून खासगी वाहनाने रवाना झाले.
गुंडाच्या टोळ्या निर्माण होण्यास ना.राम शिंदे जबाबदार
जामखेडचा बिहार होत आहे. कायद्याची कसलीच भिती राहिली नाही. येथील कायदा व सुव्यवस्था ढासळण्यास आणि गुंडाच्या टोळ्या निर्माण होण्यास पालकमंत्री राम शिंदे जबाबदार असल्याचा आरोप करत शिंदे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, राजेंद्र फाळके, प्रतापराव ढाकणे, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, डॉ.भास्कर मोरे आदिंनी आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. याठिकाणी प्रभारी अधिकारी असुन गेल्या तीन वर्षांपासुन सातत्याने जाणिवपुर्वक भाजपला मदत करणारे अधिकारी राम शिंदे यांनी नेमल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तालिमीच्या नावाखाली गुंडांच्या टोळ्या पोसण्याचे काम सुरु असल्याचेही पदाधिकार्यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात कोणीही डॉक्टर नेहमीप्रमाणेच उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ.लामतुरे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्याची मागणी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
Add new comment