बीडमधील डॉक्टरांकडून पंतप्रधान मोदींचा निषेध
आयएमए सदस्यांनी लावल्या काळ्या फिती
बीड,(प्रतिनिधी):- लंडन येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेरेबाजी करून प्रामाणिक डॉक्टरांविषयी मानहानीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी बीडमधील डॉक्टरांनी आज निषेध नोंदवला. सकाळपासूनच डॉक्टरांनी काळ्या फिती लावून रुग्ण सेवा केली. आयएमए ( इंडियन मेडिकल असोसिएशन ) च्या सर्व सदस्य डॉक्टरांनी मोदी यांचा निषेध नोंदवला.
आयएमएने म्हटले आहे की, मोदी यांनी ज्या पद्धतीचे वक्तव्य केले आहे ते जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या प्रमुखास निश्चितच शोभनीय नाही. भारतीय डॉक्टर हे त्यांच्या कौशल्याबद्दल जगभर परिचित आहेत. असे असताना पंतप्रधान मोदी यांनी सवंग लोकप्रियतेसाठी शेरेबाजी करून प्रामाणिक डॉक्टरांचा अवमान केला आहे. त्याचा निषेध नोंदविण्यात येत आहे. आज सर्व डॉक्टरांनी काळया फिती लावून मोदी यांचा निषेध नोंदवला आहे. येथील डॉ. के. बी. पैठणकर , डॉ. अनंत मुळे , डॉ. बारकुल, डॉ. पी. के. कुलकर्णी , डॉ. कोटेचा , डॉ.बहिर, डॉ. हिरवे, डॉ. सोनवणे , डॉ. प्रशांत सानप , डॉ. प्रमोद शिंदे यांच्यासह अन्य सदस्य डॉक्टर यांनी निषेध म्हणून काळ्या फिती लावल्या . राज्यभर आयएमएने काळ्या फिती लावून मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.
Add new comment