लाइव न्यूज़
नाला व सार्वजनिक मुतारीवर भीमसृष्टी उभारुन बाबासाहेबांचा अवमान करु नका -दिलीप भोसले
बीड,(प्रतिनिधी):- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्रावर आधारित भीमसृष्टी डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या उजव्या बाजूस असलेल्या २० बाय २५ च्या सार्वजनिक नाला व आठवडी बाजारासाठी असलेल्या सार्वजनिक मुतारी तोडून त्या ठिकाणी उभारण्याचा घाट नगराध्यक्षांनी सुरू केला आहे. नाला व मुतारीच्या जागेवर भीमसृष्टी उभारुन बाबासाहेब व समस्त दलित जनतेचा अवमान करु नका असे नम्र आवाहन भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भोसले यांनी नगर पालिकेचे मुख्याधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केले आहे.
अखंड देशात समतेचा संदेश देणारे, दलित, बहुजनांना सन्मानाने जगता यावे, समाजात एकोपा राहावा ही संकल्पना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून वास्तवात आणली. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्रावर भीमसृष्टी उभारण्याचे मोठे काम नगराध्यक्ष करत आहेत. परंतु ज्या ठिकाणी भीमसृष्टी निर्माण करायची आहे ती जागा चुकीची आहे. आंबेडकर पुतळ्याच्या उजव्या बाजूस २० बाय २५ च्या नाली व सार्वजनिक मुतारीवर भीमसृष्टी उभारुन नगराध्यक्ष दलित समाजाला काय संदेश देणार आहेत. डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूस मोठे अतिक्रमण आहे. ते अतिक्रमण हटविण्याचा मोठेपणा नगराध्यक्षांना सुचला नाही. येथील उद्यानामध्ये भीमसृष्टी उभा करता आली असती. परंतु उद्यानाची जागाही नगराध्यक्षांच्या नजरेस पडली नाही. उलट नाली व मुतारीची जागा दाखवून नगराध्यक्ष दलित बांधवांच्या भावनांशी खेळत आहेत. देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये कोठेही बाबासाहेबांचे स्मारक, पुतळा अथवा भीमसृष्टी ही नाली अथवा मुतारीच्या जागेवर बांधण्यात आली नाही. ज्या बाबासाहेबांनी दलित व तमाम बहुजन समाजाला तळागाळातून वर काढण्याचा प्रयत्न केला. त्याच बाबासाहेबांची भीमसृष्टी नाल्या व मुतारीवर उभारण्याचे काम होत आहे हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. नगराध्यक्षांना बाबासाहेबांविषयी व दलित समाजाविषयी एवढीच आपुलकी असेलच तर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ डाव्या बाजुला असलेले अतिक्रमण काढून त्या ठिकाणी किंवा उद्यानामधील जागेवर भीमसृष्टी निर्माण करावी. हे काम नगराध्यक्षांसाठी अशक्य नाही. परंतु हे काम करण्याची त्यांची मानसिकता आहे का हा खरा प्रश्न आहे. बाबासाहेबांचे विचार एवढ्या छोट्या जागेत बसणार नाहीत. परंतु जागा उपलब्ध असताना नाली व मुतारीवरच भीमसृष्टी उभारण्याचा घाट कशासाठी? आपण सारेच बाबासाहेबांच्या विचारला माननारे आहोत. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भीमसृष्टी उभारली तर दलित, बहुजन समाजाचा प्रतिनिधी म्हणून सर्वात अगोदर नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात येईल. जर नाली व मुतारीवर भीमसृष्टी उभारली तर दलित समाज नगराध्यक्षांना कधीच माफ करणार नाही. यामुळे भीमसृष्टीचे नियोजित काम बंद करावे व बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळील डाव्या बाजूचे अतिक्रमण काढून तेथे भीमसृष्टी उभारावी अन्यथा दलित, बहुजन समाजाच्या वतीने जिल्हाभरात मोठे आंदोलन उभा करु असा इशारा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भोसले यांनी मुख्याधिकार्यांना दिला आहे.
Add new comment