लाइव न्यूज़
भाजप सरकारने गोरगरीबांच्या योजना बंद पाडल्या - हिरालाल राठोड
Beed Citizen | Updated: April 25, 2018 - 2:50pm
बीड, (प्रतिनिधी): भाजप सरकारने राज्यातील जनतेला भुलथापा देवून फसवले आहे. गोरगरीबांच्या अनेक योजना या सरकारने बंद पाडण्याचे काम सुरु केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला. भटक्या विमुक्त घटकांच्या प्रश्नांवर बारा बलुतेदारांना सोबत घेवून रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
बीड येथील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत हिरालाल राठोड बोलत होते. यावेळी माजी आ. उषाताई दराडे, सय्यद सलीम, संदीप क्षीरसागर, ऍड. डी. बी. बागल, अमर नाईकवाडे, बाळासाहेब गुंजाळ, बाबु नहार, सुलोचना वारे आदींची उपस्थिती होती. राठोड पुढे बोलतांना म्हणाले की, राज्य सरकारने भुलथापा देवून जनतेची फसवणूक केली आहे. खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार असून यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शेवटच्या घटकांचा विचार करणारे नेते म्हणजे शरद पवार असल्याचे त्यांनी सांग्तिले. पवार यांनी भटके -विमुक्त जाती-जमातीला साडे आठ टक्के आरक्षण दिले. ते लोक आज सुखाने जगत आहेत. आज मात्र या समुहाला वाईट आल्याचे राठोड यांनी सांगितले. भटक्या-विमुक्त जातींसाठी असलेल्या योजना बंद करण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप करत अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ बंद केले. त्यामुळे वंचितांना अवहेलना सहन करावी लागत असल्याचे ते म्हणाले. वसंतराव चव्हाण तांडा वस्ती योजनाही बंद पाडण्याचे काम सरकारने सुरु केले आहे. सध्या या योजनेला एक रूपयाचेही अनुदान नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही इथले कायम स्वरूपी रहिवाशी आहोत. मात्र समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असून सरकारने आश्रम शाळेचे अनुदानही बंद केले. त्यामुळे लाखो विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. बीड जिल्ह्यात भटक्या-विमुक्त घटकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या प्रश्नावर पारंपारिक साधन घेवून बारा बलुतेदारांसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा राठोड यांनी दिला. मोर्चाची तारीख लवकरच ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Add new comment