आसारामला जन्मठेप; अन्य दोघांना प्रत्येकी २० वर्षाची शिक्षा
दिल्ली, (वृत्तसंस्था):-स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू याच्याविरोधातील बलात्कार प्रकरणात बुधवारी जोधपूरमधील न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने आसाराम बापूसह सर्व आरोपींना दोषी ठरवले असून दुपारी उशिरा न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची तर शरद आणि शिल्पी यांना प्रत्येकी २० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आसारामवर होता, ज्याची सुनावणी जोधपूरमधल्या विशेष एससी-एसटी न्यायालयात झाली.
मूळची उत्तर प्रदेशच्या शहाजहॉंपूर येथील आणि आसाराम याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणार्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरनजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून १५ ऑगस्ट २०१३ च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप होता. आसारामला इंदूरहून अटक करून १ सप्टेंबर २०१३ रोजी जोधपूरला आणण्यात आले होते. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी आसाराम व ४ सहआरोपींवर ६ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केले होते.
Add new comment