लाइव न्यूज़
बीडमध्ये जमिनीवर जबरदस्ती कब्जा करणारी टोळी सक्रिय
Beed Citizen | Updated: April 23, 2018 - 2:51pm
दमदाटीवर गुजरान करणार्यांना भुमाफिया होण्याचे स्वप्न पडू लागले
बीड, (प्रतिनिधी):- शहरातील बालेपीर भागात इतरांचा मालकी हक्क किंवा नावे असलेल्या जमिनीवर जबरदस्ती कब्जा करणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसुन येत आहे. दमदाटीवर आणि दहशत पसरवून स्वत:ची गुजरान करणार्यांना भुमाफिया होण्याचे स्वप्न पडू लागल्याने त्यांच्याकडूनच अशा प्रकारे अनाधिकृत कब्जा करण्याचे प्रकार वाढल्याची चर्चा लोकांमध्ये होवू लागली आहे. एका महिलेला पुढे करुन भिती दाखविण्याचाही प्रकार टोळीकडून सुरु असुन त्या महिलेच्या पाठीशी कोण आहे? त्याच्याविरुद्ध किती गुन्हे दाखल आहेत? आणि आतापर्यंत या टोळीने किती जणांच्या जमिनीवर कब्जा केला आहे. याची माहिती समोर येणार असुन संबंधित तक्रारदार लवकरच पोलिस अधिक्षक, विशेष पोलिस महानिरिक्षक यांच्याकडे दाद मागणार असल्याचे समजते.
बीड शहरातील बालेपीर भागामध्ये गेल्या दिवसांपासुन जमिनीवर जबरदस्ती कब्जा करणारी टोळी सक्रिय झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आतापर्यंत लोकांना दमदाटी करणे, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरविणे याद्वारे स्वत:ची गुजरान करणार्यांना आता भुमाफिया होण्याचे स्वप्न पडू लागले आहेत. त्या भागामध्ये एखाद्याच्या मालकीची किंवा नावे असलेल्या जमिनीवर जबरदस्ती कब्जा करण्याचे प्रकार या टोळीकडून वाढले आहेत. संबंधित जमिन मालकाने या संदर्भात पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केल्यास त्या तक्रारदाराला भिती दाखवून, धमकावून किंवा खोटे गुन्हे दाखल करुन शांत बसवले जात होते. अलीकडे या टोळीकडून होणारा त्रास वाढल्यामुळे तक्रारदार स्वत:हून पुढे येवू लागले आहेत. काही दिवसांपुर्वी अशाच प्रकरणांमध्ये एका विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. तेंव्हापासुन संबंधित टोळीकडून अनेकांच्या जमिनीवर डोळा ठेवला जात आहे. एखाद्याच्या जमिनीवर कब्जा करण्याच्या हेतूने एका महिलेला पुढे केले जात आहे. महिलेची भिती दाखवून जमिनीवर कब्जा मिळवला जात आहे. या सर्व प्रकारामागे मोठ्या व्यक्तीचा हात असुन तोच हा उद्योग करत असल्याची चर्चा आहे. संबंधित महिला कोण आहे? त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. जमिनीच्या प्रकरणांमध्ये वारंवार या महिलेला पुढे करणारा तो ठग कोण? याचीही पडताळणी होणे गरजेचे आहे. अनेक जमिन मालकांना या टोळीने त्रास दिलेला असुन अनेक तक्रारदार आता पुढे येवू लागले आहेत. या संदर्भात लवकरच पोलिस अधिक्षक, विशेष पोलिस महानिरिक्षक यांच्याकडे तक्रार देण्यात येणार असुन या टोळीचा म्होरक्या कोण आहे? आतापर्यंत त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे किती गुन्हे दाखल आहे? त्याच्या टोळीमध्ये आणखी कोण आहे? हे देखील जनतेसमोर येणार आहे.
Add new comment