लाइव न्यूज़
अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी
Beed Citizen | Updated: April 22, 2018 - 3:01pm
नवी दिल्ली, (वृत्तसंस्था):- १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार केल्यास आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला आज राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने पोक्सो कायद्यात सुधारणा करून काल यासंदर्भात वटहुकूम काढला होता. कठुआ, सुरत आणि इंदूर या ठिकाणी लहान मुलींवर बलात्कार करण्यात आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
केंद्र सरकारने नवीन अध्यादेशाला मंजुरी दिल्याने १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. १६ वर्षांपेक्षा मुलीवर बलात्कार केल्यास कमीत कमी १० वर्ष ते २० वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दोषीला जन्मठेपेची शिक्षा देण्याची सुद्धा तरतूद या कायद्यात आहे. पोक्सोच्या अध्यादेशाला मंजुरीसोबतच राष्ट्रपतींनी ’फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक २०१८’ या आर्थिक अध्यादेशाला सुद्धा मंजुरी दिली आहे. बलात्काराच्या घटनेआधी देशात बँक घोटाळा उघडकीस आला होता. बँकेचे हजारो कोटी रुपये घेऊन विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखे लोक देश सोडून पळून गेले आहेत.
कर्ज घेतल्यानंतर जे परदेशात पळून जातात आणि देशात परतण्यास नकार देतात अशा गुन्हेगारांना, अटक वॉरंट काढण्यात आले असेल अशा गुन्हेगारांना, तसेच ज्यांनी १०० कोटी रुपयांहून अधिक कर्जासाठी ज्यांचे नाव डिफॉल्टर्स यादीत नमूद असेल अशा गुन्हेगारांना या विधेयकातील तरतुदी लागू होणार आहेत.
Add new comment