लाइव न्यूज़
पक्षासाठी काम करणार्यांनाच संधी-जीवनराव गोरे
राष्ट्रवादीच्या बैठकीत मतभेद बाजूला ठेवून बालेकिल्ला मजबुत करण्याचे आवाहन
निवडणूकीच्या तयारी लागण्याच्या सूचना; आ.पंडित, संदिप क्षीरसागरांसह अक्षय मुंदडांचीही उपस्थिती
बीड, (प्रतिनिधी):- आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूकीसाठी प्रत्येकाने अंग झटकून कामाला लागावे अशा सूचना देत मतभेद बाजूला ठेवून बालेकिल्ला मजबुत करण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा प्रभारी जीवनराव गोरे यांनी केले. खा.शरद पवार यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून पक्षासाठी काम करतील त्यांना पक्ष संधी देईल अशी तंबी देण्यासही गोरे विसरले नाहीत.
बीड येथील राष्ट्रवादी भवनामध्ये आज सकाळी आयोजित पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्षाचे जिल्हा प्रभारी जीवनराव गोरे बोलत होते. बैठकीस आ.अमरसिंह पंडित, माजी आ.उषाताई दराडे, राजेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, ऍड.डी.बी.बागल, संदिप क्षीरसागर, अक्षय मुंदडा, बबनराव गवते, दिलीप भोसले आदिंसह सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जीवनराव गोरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. पक्ष विस्ताराच्या कार्याचा आढावा घेतला त्यानंतर जीवनराव गोरे म्हणाले, आगामी निवडणूकांच्या दृष्टीने मतभेद बाजूला ठेवून प्रत्येकाने पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत, बीड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असुन तो मजबुत करण्याचे आवाहन त्यांनी केले. पक्षासाठी आणि खा.शरद पवार यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करतील त्यांनाच पक्ष संधी देईल असे सांगुन जुन्या, नव्यांची सांगड घालण्याचे आवाहन त्यांनी केले.
Add new comment