उज्ज्वला गॅस योजनेमुळे ग्रामीण महिलांना अच्छे दिन - खा. डॉ. प्रितमताई मुंडे

परळी, (प्रतिनिधी):-      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. ग्रामीण भागातील महिलांची त्रासदायक धुरातुन मुक्तता करण्यासाठी उज्ज्वला गॅस योजना मोठ्या प्रमाणावर राबविली या महत्वाकांक्षी योजनेमुळे महिलांना अच्छे दिन आले असून यामुळे महिलांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल असे प्रतिपादन बीडच्या खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी आज वाघाळा (ता. परळी वैजनाथ ) येथील कार्यक्रमात बोलताना केले. 
     ग्राम स्वराज अभियानांतर्गत आज उज्ज्वला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गरजू महिलांना उज्ज्वला गॅसचे वितरणही करण्यात आले. यावेळी बोलताना खा. डॉ. प्रितमताई मुंडे म्हणाल्या की, पुर्वीच्या सरकारने कोणतेही मुलभूत प्रश्न सोडवण्याकडे लक्ष दिले नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यानंतर सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले असे सांगून त्या म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना त्रास होत असल्याने या महिलांच्या सोयीसाठी उज्ज्वला गॅस योजना राबवून या माध्यमातून अनेक महिलांना गॅस कनेक्शन दिले. यामुळे महिलांनी धुराच्या त्रासातून सुटका झाली आहे. चुलीवर स्वयंपाक करायला होणारा त्रास कमी झाला असुन यामुळे महिलांचे आरोग्य आबाधित राहण्यास मदत होणार आहे असेही त्या म्हणाल्या. 
    केंद्र सरकारने गोरगरीबांच्या हिताचे निर्णय घेतले असून ग्रामीण भागात अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. 
     यावेळी व्यासपीठावर भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, वैद्यनाथ कारखान्याचे संचालक किसनराव शिनगारे, जेष्ठ नेते रेशीमनाना कावळे, बळीराम गडदे, हिंदुस्थान गॅस कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर केतन कर्णिक, वैद्यनाथ गॅस एजन्सीचे डॉ. श्रीपाद बुरूकुले, वाघाळ्याचे सरपंच कृष्णा सलगर, युवा नेते संतोष सोळंके, माणिक सलगर, चेतन बुरूकुले, शंकर बुरेकुले यांच्यासह गावकरी व महिला मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सचिन स्वामी यांनी केले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.