लाइव न्यूज़
शिक्षण शुल्काच्या चौकशीसाठी समाजकल्याण मंत्र्याचा पुतळा जाळणार-डॉ.ओव्हाळ
बीड, (प्रतिनिधी):- शिक्षण शुल्क समितीने ठरवून दिलेल्या निकषानुसार महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध न करता समाजकल्याण विभागाने बीड जिल्ह्यासाठी सहा कोटींचा निधी दिला असुन आदित्य एज्युकेशन संस्थेने विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेल्या दिड लाख रुपयांचा निधी स्वत:च्या शिक्षण संस्थेच्या नावावर वर्ग करण्यात येत असुन शुल्क समितीने ठरवून दिलेल्या निकषाची चौकशी न करता निधी वाटप केला जात आहे. याची चौकशी करण्याची मागणी डॉ.आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉ.जितेंद्र ओव्हाळ यांनी केली आहे. शिक्षण शुल्काची चौकशी न झाल्यास दि.२१ एप्रिल रोजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्या समोर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करणार असल्याचे सांगितले.
उच्च शिक्षणासाठी समाजकल्याण विभागातर्ंगत मागास विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण शुल्कासाठी दिड लाख रुपयाचा निधी दिला जातो. यावर्षी सहा कोटी रुपयांचा जिल्ह्यासाठी वितरीत केला गेला आहे. शिक्षण शुल्क समितीच्या निगरानीखाली समितीने संबंधित महाविद्यालयांची विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या सुविधा पाहून सदरील शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियम असतांना नियमाला हरताळ फासत आदित्य एज्युकेशन संस्थेच्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर सदरील रक्कम जमा करण्यात आली आहे. परंतु आदित्य एज्युकेशन संस्थेत सुविधांचा अभाव असुन नियमाचे कोणतेही पालन होत नसतांना विद्यार्थ्यांच्या खात्यावरील रक्कम संस्था स्वत:च्या खात्यावर जमा करुन घेत आहे. याची चौकशी करण्याची मागणी समाज कल्याण आयुक्तास केल्यास त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे मिळाली. आदित्य एज्युकेशन संस्थेची चौकशी करुन नियमाने शिक्षण शुल्क वितरीत करावे नसता दि.२१ एप्रिल रोजी समाजकल्याण कार्यालयासमोर समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करणार असल्याचे डॉ.आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष जितेंद्र ओव्हाळ यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
Add new comment