दिल्लीच्या दोन शिक्षकांचा सिरसाळ्याजवळ कालव्यात बुडून मृत्यू

परळी, (प्रतिनिधी):- आंघोळ करण्यासाठी सिरसाळा जवळील गोवर्धन हिवरा येथील कालव्यात उतरलेल्या दोन शिक्षकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली. हे दोन्ही शिक्षक मुळचे दिल्ली येथील रहिवासी आहेत.
भानुप्रकाश (वय २१) आणि शुभमकुमार (वय २४) अशी या दोन्ही मयत शिक्षकांची नावे आहेत. हे दोघेही विवाहित असून ते अंबाजोगाईत राहतात. भानूप्रकाश हे सिरसाळा येथील देवगिरी ग्लोबल अकॅडमी या इंग्रजी शाळेत तर शुभमकुमार हे माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील सरस्वती पब्लिक स्कूल या शाळेत शिक्षक होते. शाळेनंतर दोघेही माजलगावला जाऊन शिकवणी घेत असत. बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास माजलगाव येथून शिकवणी घेऊन माघारी येत असताना आंघोळीसाठी ते गोवर्धन हिवरा येथील कालव्यामध्ये उतरले. परंतु, पाण्याचा वेग जास्त असल्याने आणि पोहता येत नसल्याने दोघेही पाण्यात बुडाले आणि वाहून गेले. दोघांचेही शव आज दि. १९ एप्रिल रोजी सकाळी सबराबाद शिवारातील एका पुलास अडकलेले आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि दोघांचेही शव अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवून दिले. दरम्यान, दोघांच्याही कुटुंबियांना दुर्घटनेबद्दल माहिती देण्यात आली असून ते अंबाजोगाईला येण्यासाठी निघाले असल्याचे समजते.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.