लाइव न्यूज़
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण: मिलिंद एकबोटेंना जामीन
Beed Citizen | Updated: April 19, 2018 - 3:37pm
मुंबई, (प्रतिनिधी):-भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांचा जामीनअर्ज गुरुवारी मंजूर झाला आहे. एकबोटे यांना ऍट्रोसिटीच्या गुन्ह्यात यापूर्वीच जामीन मंजूर झाला असून दुसर्या प्रकरणातही जामीन मिळाल्याने त्यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी दोन गटात झालेल्या वादातून हिंसाचार झाला होता. हिंसाचारात वाहनांची तोडफोड तसेच वाहने पेटवून देण्यात आली होती. दंगल घडवणे, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मिलिंद एकबोटे आणि श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
एकबोटे सध्या येरवडा कारागृहात असून ऍट्रोसिटीच्या गुन्ह्यात त्यांना यापूर्वीच जामीन मिळाला होता. दाखल झालेल्या अन्य गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी एकबोटे यांच्या वतीने वकील एस के जैन आणि अमोल डांगे यांनी जामिनासाठी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मंगळवारी या अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली होती. विशेष न्यायाधीश एस एम मेगजोगे यांच्या न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्यायालयाने एकबोटे यांना जामीन मंजूर केला असून यामुळे ते आता तुरुंगातून बाहेर येऊ शकतील.
Add new comment