बीडच्या कचराप्रश्नी माजी आ.सय्यद सलीम यांची उच्च न्यायालयात जनहित याचिका शासनासह जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, पोलिस अधिक्षकांना नोटीस
बीड (प्रतिनिधी)- शहरातील कचर्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. घनकचरा व्यवस्थापन नियमाची अंमलबजावणी होत नसल्याने नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याप्रश्नी माजी आ. सय्यद सलीम यांनी उच्च न्यायालयात ऍड. सय्यद तौसिफ यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल केली आसुन न्यायालयाने त्याची दखल घेत प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. प्रतिवादींमध्ये शासनासह शहर विकास विभाग, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, पोलिस अधिक्षक आदींचा समावेश असुन पुढील सुनावणी दि. २६ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.
बीड शहरातील कचराप्रश्नी माजी आ.सय्यद सलीम यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जनहीत याचिकेत म्हटले आहे की, येथील कचर्याची परिस्थिती विदारक झाली आहे. ठिकठिकाणी साचलेला कचर्याकडे नगरपालिकेमार्फत दुर्लक्ष होत आहे. नियमाप्रमाणे घनकचर्याचे शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. परंतु बीड पालिके मार्फत कोणत्याही वर्गीकरणाशिवाय कचरा थेट रस्त्यावर, नदीपात्रात व इतर सार्वजनिक ठिकाणी टाकला जात आहे. हे करतांना कोणत्याही परिणामाचा विचार पालिकेमार्फत केला जात नाही. पालिकेने २०१७-२०१८ या वर्षाकरिता घंटागाडीच्या निविदा काढण्यात आल्या नाहीत. शहरात जुन २०१७ ते नोव्हेंबर २०१७ पर्यंत डेंग्युचे ३५० रूग्ण आढळल्याचे याचिकेत नमुद करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे बिंदुसरा नदी पात्रात टाकण्यात येणार्या कचर्याचा विषय देखिल न्यायालयाच्या निदर्शनास आणुन देण्यात आला आहे. दोन वर्षापुर्वी आलेल्या पुराची भयावह परिस्थितीही न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिली आहे. या सर्व प्रकाराकडे नगर पालिका व स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. यासंदर्भात माजी आ. सय्यद सलीम यांनी ऍड. सय्यद तौसिफ यांच्यामार्फत याचिका दाखल केली. याप्रकरणात दि. १६ एप्रिल रोजी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एस. एम. गव्हाणे यांच्यासमोर सुनावणी झाली आहे. प्रतिवादी केंद्र शासन पर्यावरण मंत्रालय, राज्य शासन, शहर विकास विभाग, आरोग्य विभाग, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी बीड, मुख्याधिकारी नगर पालिका बीड, पोलिस अधिक्षक बीड यांना नोटीस काढली असुन याप्रकरणाची सुनावणी दि. २६ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने ऍड.सय्यद तौसिफ यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद केला.
Add new comment