लाइव न्यूज़
‘देखो बेटीयों, बीड वालोंने इंन्सानियत जिंदा की...!’
बीड, (प्रतिनिधी):- ‘बचेगी बेटी तो पढेगी बेटी, जस्टीस फॉर आसिफा, जस्टीस फॉर उन्नाव, बलात्कारीयोंका साथ देनेवाले को देशद्रोही करार दो, गुन्हेगारांना फासावर लटकवा’ अशा विविध प्रकारच्या घोषवाक्याचे फलक हाती घेऊन निघालेल्या सर्व धर्मिय, सर्व पक्षीय मोर्चाने ‘देखो बेटीयों, बीड वालोंने इंन्सानियत जिंदा की...!’ हे अख्या देशाला दाखवून दिले. अतिशय शिस्तबद्ध आणि सामुहिकरित्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या मोर्चाने बलात्कार्यांना गर्भीत ईशारा देत निषेध नोंदवला. पक्षीय जोडे आणि विविध रंगी झेंडे बाजूला ठेवून तिरंगा झेंड्यासोबत एकत्र आलेल्या सर्व धर्मियांनी अत्याचार प्रकरणात न्यायाची अपेक्षा केली. महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर मुकमोर्चाची सांगता झाली. दरम्यान तळपत्या उन्हात घामाच्या धारा प्रत्येकाच्या अंगातून निघत असतांनाही नराधमांचा निषेध नोंदवत बीडकरांनी मानवतेचा नारा दिला.
बीड येथे आज तळपत्या उन्हात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि अखंड मानव जातीचे दर्शन झाले. शहरातील किल्ला मैदान येथून मुकमोर्चाला सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या मोर्चेकर्यांनी निषेधाचे फलक हाती घेतले होते. किल्ला मैदान, कमवाडा, बलभीम चौक, कारंजा, राजुरी वेस, बशिरगंज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगररोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचलेल्या मुकमोर्चातून जम्मू-काश्मिरमधील कठुआ येथील आसिफावर झालेल्या अत्याचाराचा, उन्नाव आणि सुरत येथील घटनांचा निषेध करण्यात आला. मोर्चा दरम्यान प्रत्येक जण स्वत:हून मोर्चामध्ये सहभागी होत होता. विशेष म्हणजे लोकांनी स्वत:हून व्यवसाय बंद ठेवून मोर्चामध्ये सहभाग नोंदवत राक्षसी वृत्तीचा निषेध व्यक्त केला. प्रत्येकाच्या हातामध्ये निषेध व्यक्त करणारे फलक होते. मोर्चा मुक असला तरी फलक आणि प्रत्येकाच्या मनातील भावनांनी त्यास बोलके स्वरुप दिले होते. मोर्चातील महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. आसिफाच्या सरकारी वकील ऍड.दिपिका सिंह राजावत यांना पोलिस संरक्षण द्यावे, त्यांच्यावर दबाव आणणार्या आणि न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप व अडथळा निर्माण करणार्या जम्मू-काश्मिर बार कौन्सिलच्या सनदा रद्द कराव्यात, उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आ.कुलदिपसिंह सेंगर यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, तिरंगा झेंड्याचा दुरुपयोग करुन आरोपीची पाठराखन करणार्या मोर्चेकर्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, महिला अत्याचार संदर्भातील केसेस जलदगती न्यायालयात चालवून यासाठी स्वतंत्र न्यायालयाची तरतुद करावी, देशाच्या विविध भागात अत्यंत अमानुषपणे महिला, मुलीवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभुमीवर केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी राजीनामा द्यावा, महिला अत्याचार संदर्भातील शिक्षेचे प्रमाण अत्यल्प असुन त्यामध्ये वाढ करावी, महिला अत्याचार प्रकरणातील केसेसमध्ये फरार आरोपींची मालमत्ता तात्काळ जप्त करण्याचे आदेश द्यावेत, कठुआ, उन्नाव, सुरत प्रकरणातील फिर्यादी व साक्षीदारांना पोलिस संरक्षण देवून त्यांचे पुनर्वसन करावे, पोक्सो २०१२ कायद्याप्रमाणे महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये कमीत कमी सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद करावी, आसिफाबानो, उन्नावप्रकरणातील फाशीची शिक्षा द्यावी, आरोपींना पाठीशी घालणार्या आरएसएस व हिंदू एकता मंच यांना दहशतवादी संघटन घोषित करुन त्यांच्यावर बंदी घालून त्यांच्या प्रमुखांवर गुन्हे दाखल करावेतया मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना देण्यात आले. निवेदनावर सर्व पक्षीय, सर्व धर्मिय, समाजिक संघटना, सामान्य नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत. प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर मुकमोर्चाची सांगता झाली. सर्व धर्मिय, सर्व पक्षीय, मुकमोर्चामध्ये सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना, मराठा क्रांती मुकमोर्चा, वकील, शिक्षक, डॉक्टर्स, पत्रकार, इंजिनिअर, व्यापारी आणि सामान्य नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांचाही चोख बंदोबस् होता.
बचेगी बेटी तो...
देशात महिला आणि मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ एका मुलीच्या पालकाने मोर्चेकर्यांचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. मुलीच्या हातात खेळणीतील बंदूक देवून तिला खांद्यावर उचलून मोर्चात सहभागी झालेल्या पालकाने दिलेला उदिग्न संदेश अखंड समाज व्यवस्थेला अर्ंतमुख करणारा आहे. शासन, प्रशासन आणि समाज व्यवस्था नराधमांना रोखण्यास अपयशी ठरली तर स्वसंरक्षणासाठी मुलींच्या हाती बंदूक द्यावी लागेल असाच संदेश या माध्यमातून मुलीने आणि तिच्या पालकाने दिला.
संयमाचा बांध तुटला अन फाशी....फाशी....!
महिला आणि मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झालेल्या मुकमोर्चा अचानक बोलका झाला. हातात निषेधाचे फलक घेऊन तळपत्या उन्हात उभ्या असलेल्या तरुणांच्या संयमाचा बांध तुटला आणि मुठ आवळत वर हात करुन फाशी...फाशी..., आसिफाको न्याय दो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या घोषणांमधुन मुकमोर्चातील संताप प्रामुख्याने आधोरेखित झाला.
बाजारपेठ बंद, प्रत्येकाने नोंदवला सहभाग
अत्याचाराच्या घटना रोखून राक्षसी वृत्तीला ठेचून काढण्याच्या उद्देशाने प्रत्येक जण मोर्चामध्ये सहभागी झाला होता. बीड शहरातील व्यापारी, व्यवसायिकांनी बाजारपेठ बंद ठेवून मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. प्रत्येक जण हातातील काम सोडून चालत्या मोर्चामध्ये सहभागी होत असल्याचे चित्र आज शहरात पहायला मिळाले.
--
मलाही न्याय द्या..
मोर्चा मुक असला तरी त्यामध्ये सहभागी प्रत्येकाच्या हातातील फलक मनातील संवेदना व्यक्त करत होता. मी पण निर्भयाची बहिण, मलाही न्याय द्या या फलकाने सर्वांचे लक्ष वेधले.
Add new comment