बीडमधील मूक मोर्चात मराठा क्रांती मोर्चाही सहभागी
मुलींच्या संरक्षणासाठी एक होण्याचे आवाहन
————————————————————
बीड, (प्रतिनिधी):- जम्मू काश्मिरमधील आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. उन्नाव आणि सुरत मध्येही अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ आज मंगळवार दि. 17 एप्रिल रोजी सर्व पक्षीय ,सर्व धर्मीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाही यामध्ये सहभागी होणार असून भारतीय मुलींच्या संरक्षणासाठी आजच्या मोर्चात मराठा बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
बीड येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की , आज मंगळवार दि. 17 एप्रिल रोजी सर्व धर्मीय मूक मोर्चा काढण्यात येत आहे. भारतीय मुलींच्या संरक्षणासाठीच्या मूक मोर्चात मराठा बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या कठुआ येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश मधील उन्नाव , गुजरातमधील सुरत आणि बीड जिल्ह्यातील परळी येथील अत्याचाराच्या घटना घडल्या अशा घटनांचा निषेध नोंदवून त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अत्याचाराच्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कायद्यात सुधारणा करावी आदी मागण्यांसाठी आज मंगळवारी किल्ला मैदानापासून कारंजा , राजुरीवेस, बशीरगंज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येत आहे. सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय मूक मोर्चात मराठा क्रांती मोर्चानेही सहभागी होण्याबाबत आवाहन केले असून जिल्ह्यातील नागरिक , महिला आणि युवतींनी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चात सहभागी होऊन राक्षसी वृत्तीचा निषेध नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Add new comment